09.01.2025: मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक : राज्यपाल सी पी राधाकृष्णन
मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक : राज्यपाल सी पी राधाकृष्णन
सनातन धर्म हा केवळ धर्मच नाही; तर त्याही पलीकडे ती जीवन पद्धती आहे. सनातन धर्माने प्रत्येक धर्माचा स्वीकार व आदर केला आहे. सहिष्णुता व सर्वसमावेशकता ही सनातन धर्माची बलस्थाने आहेत. त्यामुळे मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.
राज्यपाल राधाकृष्णन यांनी मुंबईतील महाराणी अहिल्यादेवी होळकर मैदान गोरेगाव येथे सुरु असलेल्या ४ – दिवसांच्या हिंदू आध्यात्मिक आणि सेवा मेळाव्याला गुरुवारी (दि. ९) संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते.
मेळाव्याचे आयोजन हिंदू आध्यात्मिक व सेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
भारत हा जगातील एकमात्र देश असेल येथे ज्यू लोकांना कुठल्याही प्रकारच्या भेदभावाचा सामना करावा लागला नाही. येथील लोक स्वभावतःच धर्मनिरपेक्ष आहेत. दयाभाव येथील संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळेच कोरोना महामारीच्या काळात भारताने कोविड लस स्वतःपुरती न वापरता जगातील गरीब देशांना देखील विनामूल्य उपलब्ध करून दिली, असे राज्यपालांनी सांगितले. त्यामुळे मानवतेच्या सेवेसाठी भारताला बलशाली होणे आवश्यक आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांनी मेळाव्यात आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. हे प्रदर्शन दि. ९ ते १२ जानेवारी पर्यंत सुरु राहणार असून या भारताच्या समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करणे हा या मेळाव्याचा उद्देश आहे, असे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाला हिंदू आध्यात्मिक आणि सेवा फाउंडेशनचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत सिंह कोठारी, श्रीमती. शारदा रामप्रकाश बुबना,सीए के सी जैन, गिरीश भाई शहा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.