08.12.2020 : राज्यातील चार आकांक्षित मागास जिल्ह्यांच्या प्रगतीचा घेतला आढावा
राज्यातील चार आकांक्षित मागास जिल्ह्यांच्या प्रगतीचा घेतला आढावा
आकांक्षित मागास जिल्हयांचे रॅंकिग सुधारल्याबद्दल राज्यपालांची जिल्ह्यांना कौतुकाची थाप
वर्ग ३ ची रिक्त पदे भरण्याच्या सूचना
राज्यातील गडचिरोली, नंदुरबार, उस्मानाबाद व वाशिम या ४ आकांक्षित जिल्ह्यांनी २०१८ च्या तुलनेत मानव निर्देशांकात प्रगती करून आपले एकूण मानांकन (रॅंकींग) सुधारल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समाधान व्यक्त करताना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना कौतुकाची थाप दिली.
विविध विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेताना राज्यपालांनी सर्व आकांक्षित जिल्ह्यांना वर्ग ३ ची पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले.
वर्ग ३ ची पदे रिक्त राहिली तर त्याचा विविध सेवांवर, विशेषतः आरोग्यसेवा क्षेत्रावर विपरीत परिणाम होतो असे सांगून जिल्हाधिकार्यांनी रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करावे, आपणही त्यात लक्षं घालू असे राज्यपालांनी सांगितले.
राज्यातील चार आकांक्षित जिल्ह्यांच्या जिल्हयाधिकार्यांशी राज्यपालांनी मंगळवारी (दि.८) व्हिडिओ कॉंफरन्सिंगद्वारे चर्चा करून जिल्ह्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
देशातील आकांक्षित जिल्ह्यांच्या प्रगतीचा अहवाल राष्ट्रपती महोदयांना नियमितपणे सादर करावा लागतो याकरिता राज्यातील आकांक्षित जिल्हयांची प्रगति जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषि व जलसंसाधन, आर्थिक समावेशन व कौशल्य विकास तसेच पायाभूत सुविधा या निदेशांकांवर आकांक्षित जिल्ह्याने काय प्रगती केली याची विस्तृत माहिती राज्यपालांनी यावेळी घेतली.
नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुखराजन यांनी यावेळी विविध क्षेत्रातील जिल्ह्यांच्या प्रगतीची माहिती दिली.