बंद

    08.07.2024: राज्यपालांच्या उपस्थितीत पीपल्स एजुकेशन सोसायटीचा वर्धापन दिन साजरा

    प्रकाशित तारीख: July 8, 2024
    Governor presides over the Foundation Day of the Peoples' Education Society

    उज्वल निकम, संजीवनी मुजुमदार, प्रा.सुरेश गोसावी, नागसेन कांबळे – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित

    राज्यपालांच्या उपस्थितीत पीपल्स एजुकेशन सोसायटीचा वर्धापन दिन साजरा

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४५ साली स्थापन केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही देशातील एक अग्रणी शैक्षणिक संस्था असून गेल्या ८ दशकांमध्ये, सोसायटीने सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय लोकांच्या अनेक पिढ्यांना शिक्षित व स्वावलंबी केले आहे. आज संस्था विविध अडचणींना तोंड देत आहे. या समस्या सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन राज्यपाल बैस यांनी आज येथे दिले. राज्यपाल बैस यांच्या मुख्य उपस्थितीत पीपल्स एजुकेशन सोसायटी शिक्षण संस्थेचा ७९ वा वर्धापन दिन सोमवारी (दि. ८) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

    कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री व पीपल्स एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामदास आठवले, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ सुखदेव थोरात, सोसायटीचे विश्वस्त उज्वल निकम, एडव्होकेट बी.के. बर्वे, सचिव डॉ वामन आचार्य, सहसचिव डॉ यु एम मस्के, कार्यकारी समिती अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे आदी उपस्थित होते.

    ज्यांनी जोखीम पत्करली, महासागरांवर वर्चस्व निर्माण केले आणि उद्योजक आणि व्यवसाय करण्यासाठी देश आणि खंड पार केले, त्यांनी जगावर राज्य केले. भारत अनेक शतकांपासून सागरी राष्ट्र होते. जगातील अनेक दूरवरच्या देशांशी भारताचे व्यापारी संबंध होते. देशाला त्याचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी शिक्षण, उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, कौशल्य शिक्षण आणि उद्यमशीलतेला प्राधान्य द्यावे लागेल, असे राज्यपालांनी सांगितले.

    दलितांच्या उन्नतीसाठी शिक्षण हे एकमात्र प्रभावी माध्यम आहे. केवळ शिक्षणाद्वारे पीडित भारतीय जनतेला त्यांच्या मानव म्हणून असलेल्या अधिकारांची जाणीव करून दिली जाऊ शकते, असे डॉ. आंबेडकरांचे ठाम मत होते, असे राज्यपालांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आज मुंबई, नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नांदेड, बंगलोर आणि बिहारमध्ये अनेक शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे चालविली जात असून एकूण दीड लाख विद्यार्थी विविध शैक्षणिक सुविधांचा लाभ घेत असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आज जगातील सर्वात तरुण राष्ट्र म्हणून उदयास आले आहे. जगातील अनेक देश, विशेषत: वृद्ध देश त्यांच्या कुशल मनुष्यबळाची पूर्तता करण्यासाठी भारताकडे पाहत आहेत. या दृष्टीने पीपल्स एज्युकेशन सोसायटीने उच्च शिक्षणाला कौशल्य शिक्षणाची जोड द्यावी तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता विषयाबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावे असे राज्यपालांनी सांगितले.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महिला सक्षमीकरणाचे खंदे पुरस्कर्ते होते. विद्यापीठे तसेच महाविद्यालयांच्या नियामक मंडळांवर तसेच इतर महत्वाच्या निर्णय घेणाऱ्या संस्थांवर महिलांचा समावेश करावा, असे आवाहन राज्यपालांनी केले.

    समाजातील विषमता संपावी या दृष्टीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एजुकेशन सोसायटीची रचना सर्वसमावेशक केली होती. आज पीपल्स एज्युकेशन सोसायटी अनेक समस्यांना तोंड देत आहे. या सोसायटीला राज्यपाल सहकार्य करतील अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केली.

    महाराष्ट्रात उच्च शिक्षणाचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगले आहे. परंतु अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील युवकांचे सकल नोंदणीतील प्रमाण कमी आहे. ही तफावत कमी करण्यासाठी पीपल्स एजुकेशन सोसायटीसारख्या संस्थांना सरकारने विशेष अनुदान देऊन मदत करणे आवश्यक आहे असे प्रा सुखदेव थोरात यांनी यावेळी सांगितले.

    डॉ आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थांपैकी सिद्धार्थ महाविद्यालय, मिलिंद महाविद्यालय, विद्यार्थी वसतिगृहे आज पायाभूत सुविधांच्या अभावाने वाईट स्थितीत आहेत. या संस्थांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करावी अशी मागणी थोरात यांनी केली.

    पूर्वी विद्यार्थ्यांना मॅट्रिक परीक्षेनंतर दिली जाणारी शिष्यवृत्ती सहा महिन्यांनी किंवा वर्षभराने न देता दर महिन्याला दिली जावी अशीही त्यांनी मागणी केली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण सोडण्याचे प्रमाण कमी होईल असे त्यांनी सांगितले.

    यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले.

    सिम्बायोसिस सोसायटीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाच्या संचालिका संजीवनी शांताराम मुजुमदार, सरकारी वकील उज्वल निकम, एडव्होकेट बी.के. बर्वे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा सुरेश गोसावी, चैत्यभूमी स्मारक समितीचे महासचिव नागसेन कांबळे, लोककलेचे अभ्यासक गणेश चंदनशिवे, यशदाचे बबन जोगदंड, सिंघानिया शाळेच्या संचालिका रेवती श्रीनिवासन आदींना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.