बंद

    08.07.2022 : पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 77 वा वर्धापन दिन सोहळा

    प्रकाशित तारीख: July 8, 2022

    नव्या पिढीने महापुरुषांचा इतिहास वाचावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 77 वा वर्धापन दिन सोहळा

    मुंबई, दि 8 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या महापुरुषांचा नव्या पिढीने इतिहास वाचण्याची गरज व्यक्त करुन देशभरात डॉ. आंबेडकर यांनी स्थापित केलेल्या विविध संस्‍था जीवित ठेवून त्या टिकविण्याची जबाबदारी प्रत्येक शासनाची आहे. राज्यातील महापुरुषांचा इतिहास लाभलेल्या संस्था टिकविण्यासाठी राज्य सरकारही संस्थांना सहकार्य करेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

    मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील दीक्षांत सभागृहात राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या उपस्थितीत पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 77 व्या अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होतो, यावेळी श्री. कोश्यारी बोलत होते. या सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विधान परिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

    राज्यपाल म्हणाले की, देशात अनेक महापुरुष निर्माण झाले आहेत. या महापुरुषांचा इतिहास, विचार समाजात रुजविण्यासाठी अनेक संस्था कार्य करीत आहेत. यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी स्थापित केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा समावेश आहे. अशा संस्थांच्या माध्यमातून मुलांना महापुरुषांचा इतिहास, त्यांचे विचार आणि जीवन जगण्यासाठी प्रेरित करण्याची गरज असून या नव्या पिढीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद अशा अनेक महापुरुषांचा इतिहास वाचावा. जेणेकरुन देशभरात नवी ताकद निर्माण होऊन देश पुढे जाईल. पीपल्स एज्युकेशन सोसायटी निश्चितच आपल्या कार्यातून देश निर्माण कार्य करेल आणि यापुढेही संस्था टिकून ठेवली जाईल. संस्थेपुढे येणाऱ्या समस्या राज्य सरकार आणि संस्था एकमेकांच्या सहकार्याने सोडविल्या जातील. आगामी काळात पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारी आदर्श संस्था निर्माण करण्याच्या भावनेने काम केले जाईल, असा विश्वास श्री. कोश्यारी यांनी व्यक्त केला.

    बालकांना मराठी शिकवा

    मराठी वृत्तपत्रांमध्ये राज्यातील मराठी शाळा बंद होत असल्याच्या बातम्या वाचनात येत आहेत. महाराष्ट्रात राहतोय तर मराठी बोललेच पाहिजे. माझा अभ्यास कमी असला तरीही मी मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो. मात्र आजच्या बालकांना त्यांच्या पालकांनी मराठी शिकवावी, असा आग्रह सुद्धा राज्यपालांनी यावेळी आवर्जून केला.

    केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, संविधान रचयते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचित बहुजन घटकांच्या शिक्षणासाठी 1945 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊन घडविले जात आहेत. संस्थेचे कामकाजही चांगल्या रितीने सुरु आहे. राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारमध्ये सामाजिक न्याय विभागाला सक्षम नेतृत्व मिळेल अशी आशा व्यक्त करुन राज्य सरकारच्या माध्यमातून बहुजनांना न्याय देण्याचे काम होईल. तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे रुपांतर विद्यापीठात व्हावे अशी मागणीही होत आहे, असे श्री. आठवले यांनी सांगितले.

    श्री. प्रविण दरेकर म्हणाले, पीपल्स एज्युकेशन सोसायटीला मागील काळात 12 कोटींचा निधी मिळवून दिला. राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल. तसेच राज्य शासनाकडून वेळोवेळी मदत केली जाईल.

    यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच माजी विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.