बंद

    08.03.2025: अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायबुद्धी व करुणाभावने जनतेची सेवा केली: राज्यपाल सी पी राधाकृष्णन

    प्रकाशित तारीख: March 8, 2025
    08.03.2025: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

    अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायबुद्धी व करुणाभावने जनतेची सेवा केली: राज्यपाल सी पी राधाकृष्णन

    महाराणी अहिल्यादेवी होळकर या आदर्श शासक आणि कुशल प्रशासक होत्या. त्यांनी न्यायबुद्धी, प्रामाणिकपणा आणि करुणाभावाने जनतेची सेवा केली. अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याकरिता समाज माध्यमे व डिजिटल माध्यमे यांचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

    राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत श पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि. ८ मार्च) बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज कन्व्हेन्शन सेंटर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह समिती मुंबईतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन कार्य सांगणाऱ्या संकेतस्थळाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

    महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी सुशासनाचा आदर्श ठेवला व सामान्य माणसाला न्याय उपलब्ध करून दिला. संपूर्ण देशात विविध ठिकाणी त्यांनी मंदिरांचे पुनर्निर्माण केले, जलाशये बांधली व कर प्रणाली तयार केली. त्यांचे कार्य आज देखील काही ठिकाणी उभे आहे यावरून त्यांच्या व्यापक कार्याची प्रचिती येते असे त्यांनी सांगितले.

    आद्य शंकराचार्यांनी देशाच्या विविध भागात पीठांची स्थापना करून सांस्कृतिक ऐक्य प्रस्थापित केले तर अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिरांचे पुनर्निर्माण केले. आपल्या कार्यातून त्यांनी सर्वसमावेशक संपन्नता निर्माण केली, असे राज्यपालांनी सांगितले.

    कार्यक्रमाला वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूएचएफ) चे संस्थापक आणि अध्यक्ष स्वामी विज्ञानानंद, कर्नाटकच्या माजी मुख्य सचिव के रत्न प्रभा, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सह-संघचालक, विष्णू वझे, राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती, समारोह समितीच्या सचिव मनीषा मराठे, धीरज बोरीकर, माजी खासदार डॉ विकास महात्मे आदी उपस्थित होते.