बंद

    08.01.2021 : राज्यपालांच्या हस्ते ११ वे केशवसृष्टी पुरस्कार प्रदान

    प्रकाशित तारीख: January 8, 2021

    करोना योद्ध्यांचा राजभवन येथे सन्मान

    राज्यपालांच्या हस्ते ११ वे केशवसृष्टी पुरस्कार प्रदान

    सुख दुःखात एक दुसऱ्याला मदत करण्याची भारताची संस्कृती आहे. करोनाकाळात लोकांनी आपल्यातील मातृत्वभाव व सेवा भाव जागवला तसेच प्रसंगी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. त्यामुळेच भारतातील करोना बाधितांचे तसेच करोना बळींचे प्रमाण जगाच्या तुलनेत कमी राहिले, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    वैद्यकीय सेवा, पर्यावरण रक्षण, स्वच्छता, पोलीस, प्रशासन यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १३ करोना योद्ध्यांना तसेच अशासकीय संस्थांना राज्यपालांच्या हस्ते शुक्रवारी राजभवन येथे ११ वे केशवसृष्टी पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केशवसृष्टीशी निगडीत २१ करोना योद्ध्यांचा देखील राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    भारतात अनादी काळापासून स्वच्छतेची परंपरा आहे. घरी आलेल्या अतिथीचे पाय धुण्याची येथे पद्धत होती. येथील आहार व खाद्यसंस्कृती देखील विकसित होती. सेवाभाव हा लोकांचा स्थायीभाव होता व आहे. करोना काळात अनेक व्यक्तींनी तसेच अशासकीय संस्थांनी निःस्वार्थ भावनेने कार्य केले. त्यामुळे देशातील करोना रुग्णांचे प्रमाण नियंत्रणात राहिले, असे राज्यपालांनी सांगितले.

    केशवसृष्टी ही संस्था डॉ. हेडगेवार यांच्या ‘संघटीत होऊन कार्य करा’ या संदेशानुसार कार्य करीत असल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले. सर्व देवांना नमस्कार केला असता तो अंतिमतः केशवालाच पोहोचतो या सुभाषिताचे स्मरण देऊन केशवसृष्टीच्या सर्वसमावेशक कार्याने समाजाचे कल्याण व्हावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

    यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता व केशवसृष्टी पुरस्कार समितीच्या अध्यक्षा हेमाताई भाटवडेकर उपस्थित होते.

    नायर रुग्णालयाच्या डॉ उन्नती देसाई, डॉ गोविंद पाठारे, भारतीय पोलीस सेवेतील प्रमोद निबाळकर, मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी राजेंद्र घाटे, पर्यावरण दक्षता तसेच कचरा व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करणारे विद्याधर वालावलकर, परिचार‍िका ज्योत्सना इंगोळे, अनाम प्रेम संस्था (अजित कुलकर्णी), हुसैन शेख, जयश्री साळवे, शितल झांबरे, सुभाष चव्हाण, गोरक उबाळे, व संतोष बोराडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

    केशवसृष्टीच्या माध्यमातून कार्य करणारे सुशिल जाजु, रमाकांत ट‍िब्रेवाल, विशाल टिब्रेवाल, राजेश चौधरी, योगिता साळवी, गोपाळ रैथत्ता, डॉ वैदांती पाकियम, सिध्दांर्थ लाडसरिया, वरुण संघवी, प्रिया मोहन, डॉ झारा शाह, डॉ सुजाता बावेजा, सुभाष दळवी, शिशीर जोशी, सेवा सहयोग संस्थेचे संजय हेडगे, प्रजा फांऊडेशनचे मिलींद म्हस्के, चिंगारी शक्ती फांऊडेशनच्या पिंकी राजगढीया, राधा स्वामी संतसंगचे जगदीश चंद सेठी, समस्त महाजन व जैन संघाचे हिरा भाई व गिरीश भाई व रोटरी क्लबचे शशी छैय्या यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.