07.11.2020: राज्यपालांच्या हस्ते डॉ. आंबेडकर पुरस्कार प्रदान
राज्यपालांच्या हस्ते डॉ. आंबेडकर पुरस्कार प्रदान
· सुनिल शेटटी, सोनु निगम, ऋचा चड्डा, भारती लवेकर सन्मानित
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई येथे १० वे भारतरत्न डॉ आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अभिनेते सुनिल शेटटी, पार्श्वगायक सोनु निगम, अभिनेत्री ऋचा चड्डा आणि झरा खान, आमदार डॉ भारती लवेकर यांसह दहा व्यक्ती व संस्थांना हे पुरस्कार करोना काळातील समाज कार्याबददल प्रदान करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अतिशय प्रेरणादायी असून त्यांचे विचार भावी पिढ्यांना देखील नेहमीच मार्गदर्शन करीत राहतील, असे उद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.
सांसदीय राजकरणात हार-जीत होत असते, परंतु समाजसेवेत नेहमी लोकांचे प्रेम मिळते. निस्वार्थ सेवेचा आनंद अवर्णनीय आहे, त्यामुळे सर्वांनी जीवनातील थोडा वेळ तरी समाजकार्यासाठी दिला पहिजे, असे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले.
करोना काळात सामान्य लोकांना मदत केल्याबददल राज्यपालांच्या हस्ते ईस्कॉन मंदीर, जुहू, सेंट पिटर्स चर्च, आययुव्ही फाउंडेशन, तसेच युवा संगीतकार तनिष्क बागची, साईबाबा हॉस्पीटलचे डॉ एन ए हेगडे, व्यवसायी मेहूल मेहता, समाज सेवक अब्दुल रहेमान वानू, यांसह निवडक व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
बुद्ध क्रिएशन ऑफ इंडियन सिनेमा या संस्थेने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष कैलास मासूम व आश्रयदाते कृष्णा पिंपळे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन अभिनेते अमन वर्मा यांनी केले.
**