07.07.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत कचरावेचक महिलांसाठी टीबी मुक्त मुंबई अभियान
राज्यपालांच्या उपस्थितीत कचरावेचक महिलांसाठी टीबी मुक्त मुंबई अभियान
महाराष्ट्र लोकभवनच्या पुढाकाराने व बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान अंतर्गत आज कचरा वेचक महिलांसाठी फाईन आर्ट सोसायटी चेंबूर मुंबई येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर व ‘नमस्ते’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल तसेच अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते कचरा वेचक महिलांना ‘आयुष्यमान कार्ड’ व आरोग्य रक्षणासाठी पीपीई किट देण्यात आले.
कार्यक्रमाला कचरा वेचक महिलांच्या उत्थानासाठी कार्य करीत असलेल्या सुशीला साबळे, नगर सेविका व प्रभाग समितीच्या अध्यक्षा आशा मराठे, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, अतिरिक्त आयुक्त डॉ विपीन शर्मा, ज्योती म्हापसेकर, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थानं) डॉ किरण दिघावकर व देवनार परिसरातील कचरा वेचक महिला आदी उपस्थित होते.
********************
बृहन्मुंबई महानगरपालिका
जनसंपर्क विभाग
दिनांक ०७ जुलै २०२६
स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान म्हणजे श्रमप्रतिष्ठेचा सन्मान; त्यांचे आरोग्य, सुरक्षितता व सामाजिक संरक्षणासाठी एकत्रित प्रयत्न करावेत – माननीय राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा
• ‘टीबीमुक्त मुंबई’ अभियान अंतर्गत कचरा वेचकांना आयुष्मान भारत आरोग्य कार्ड व पीपीई किटचे वितरण
मुंबई शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यात कचरा वेचणारे आणि स्वच्छता कर्मचारी यांचे योगदान अमूल्य आहे. ऊन, पाऊस किंवा इतर प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता हे कर्मचारी सातत्याने सेवा बजावत असतात. त्यामुळे कचरा वेचक खऱ्या अर्थाने देशाचे ‘स्वच्छता दूत’ आहेत. देशात घनकचरा व्यवस्थापनाचे धोरण अस्तित्वात येण्यापूर्वीपासूनच हे कामगार कचरा संकलन, वर्गीकरण आणि पुनर्वापराचे कार्य करत असून त्यांच्या योगदानामुळे क्षेपणभूमीवरील (डम्पिंग ग्राऊंड) ताण कमी होतो. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन होते आणि शाश्वत विकासाला चालना मिळते. स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान म्हणजे श्रमाच्या प्रतिष्ठेचा सन्मान होय. त्यामुळे, त्यांचे आरोग्य, सुरक्षितता व सामाजिक संरक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, निवासी संस्था, शैक्षणिक संस्था, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्था आदींनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांनी केले आहे.
महाराष्ट्र लोकभवन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘टीबीमुक्त मुंबई’ अभियान अंतर्गत कचरा वेचकांना आयुष्मान भारत आरोग्य कार्ड व वैयक्तिक सुरक्षा उपकरणे (पीपीई) किट माननीय राज्यपाल यांच्या हस्ते आज (दिनांक ७ जुलै २०२६) वितरित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. चेंबूर येथील फाईन आर्ट्स कल्चरल सेंटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सुप्रसिद्ध अभिनेते श्री. जॅकी श्रॉफ, स्थानिक नगरसेविका व एम पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षा श्रीमती आशा मराठे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, माननीय राज्यपाल यांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर, उप आयुक्त ( सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी श्रीमती दक्षा शहा, इंटरनॅशनल अलायन्स ऑफ वेस्ट पिकर्सच्या उपाध्यक्षा श्रीमती सुशीला साबळे यांच्यासह राज्य आरोग्य विभाग, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच स्वच्छता कर्मचारी आणि कचरा वेचक आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
माननीय राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा पुढे म्हणाले की, कचरा वेचणाऱ्या बांधवांना दररोज घातक कचरा, विषारी पदार्थ, घातक वस्तू आणि संसर्गजन्य रोगांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना विविध आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत आयुष्मान भारत आरोग्य कार्ड आणि पीपीई किटचे वितरण हा त्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. ‘टीबीमुक्त मुंबई’ हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. याबद्दल त्यांनी महानगरपालिका प्रशासनाचे अभिनंदन केले.
भारत सरकारच्या ‘नमस्ते’ (NAMASTE) योजनेमुळे स्वच्छता व्यवस्थेचे यांत्रिकीकरण, सुरक्षित कार्यपरिसर आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा मिळण्यास चालना मिळत आहे. महानगरपालिका, उद्योग, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी कचरा वेचणाऱ्या बांधवांच्या आरोग्य, सुरक्षितता, शिक्षण आणि जीवनमान उन्नतीसाठी संयुक्तपणे कार्य करावे. घरगुती कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून प्रत्येक नागरिक स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम अधिक सुरक्षित करू शकतो. आजच्या उपक्रमामुळे हजारो कचरा वेचणारे आणि स्वच्छता कर्मचारी यांच्या आरोग्य संरक्षणाला बळ मिळेल, असा विश्वासही माननीय राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांनी व्यक्त केला.
सुप्रसिद्ध अभिनेते श्री. जॅकी श्रॉफ म्हणाले, मुंबई शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवणारे स्वच्छता कर्मचारी आणि कचरा वेचक खरे हिरो आहेत. कचरा वेचक रोज सकाळी कचरा उचलतात त्यामुळेच आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. शहर स्वच्छ ठेवण्याबरोबरच कचरा वेचकांनी आपल्या आरोग्याचीदेखील काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे म्हणाल्या, मुंबईला टीबीमुक्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न प्रयत्न करत आहे. मुंबईतील दाटीवाटीच्या वस्तीमधील अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर त्वरित उपचार केले तर अशा रुग्णांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल. तसेच प्राथमिक लक्षणे दिसताच रुग्णांनी महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार घ्यावेत. टीबीमुक्त मुंबई हे केवळ एक अभियान न राहतात याची एक मोठी लोक चळवळ बनणे आवश्यक आहे. कारण अशा अभियानांमध्ये लोकांचा सहभाग वाढला तर त्याचे सकारात्मक परिणाम लवकर दिसून येतात. टीबीमुक्त मुंबई, निरोगी मुंबई आणि स्वच्छ मुंबईसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सातत्याने कार्यरत आहे.
*
(जसंवि/२७५)