07.07.2022: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ
कृषितंत्रज्ञानाच्या सहाय्याने देशाला समृद्धीकडे नेऊ- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मिळालेल्या ज्ञानाचा वापर समाजाच्या विकासासाठी करा- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
अकोला, दि.७ (जिमाका)- विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचे उद्देश ओळखावे. आदर्श नागरिक बनण्याचे संस्कार घेऊन विद्यापीठातून बाहेर पडावे, जेणे करुन आपण सर्व मिळून कृषितंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवू आणि देशाला समृद्धीकडे नेऊ शकू,अशा शब्दात राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात स्नातकांना मार्गदर्शन केले.
‘डॉक्टर ऑफ सायन्स’, या मानद पदवीने सन्मानित केंद्रीय रस्ते वाहतुक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही यावेळी उपस्थित पदवीधरांना, नव्या शेती तंत्रज्ञान आणि उद्योगाच्या प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी योग्य ध्येय्यदृष्टी असलेले योग्य नेतृत्व व्हा,अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.
येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३६ वा दीक्षांत समारंभ आज येथे पार पडला. या सोहळ्यासाठी राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी, केंद्रीय रस्ते वाहतुक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी, पंडीत दीनदयाल उपाध्याय पशुचिकित्सा विज्ञान विश्वविद्यालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे माजी कुलगुरु डॉ. एम. एल. मदान, कुलगुरु डॉ. विलास भाले, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, आ. वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आ. रणधीर सावरकर, अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर तसेच सर्व प्राध्यापक, विविध क्षेत्रातील मान्यवर व स्नातक उपस्थित होते.
या पदवीदानात विद्यापीठातर्फे ३६४६ विद्यार्थ्यांना (स्नातक, स्नातकोत्तर व आचार्य) विविध पदव्या देण्यात आल्या.
या समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या पदवीने सन्मानित करण्यात आले.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, जिवनाचे ध्येय्य ठरवून आदर्श नागरिक होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. नव्या तंत्रज्ञानाचा अंगिकार करुन आपण शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचवावे. प्रत्येक शेतकऱ्याच्या जीवनात आपण सकारात्मक बदल घडवू शकतो. त्यासाठी आपण सारे मिळून प्रयत्न करु या,असे आवाहन श्री. कोश्यारी यांनी केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मानद पदवी बद्दल विद्यापीठ व कार्यकारी समितीचे आभार व्यक्त केले. आपल्या भाषणात श्री. गडकरी यांनी सांगितले की, कोणताही पदार्थ आणि व्यक्ती ही निरुपयोगी असत नाही. त्याचा वापर कसा करावा याचे ज्ञान आपल्यापाशी असणे आवश्यक आहे.
मिळालेल्या ज्ञानाचा वापर समाजाच्या विकासासाठी करण्याचे उद्दिष्ट आपले असले पाहिजे. विदर्भाची पिकस्थिती ध्यानात घेऊन त्याविषयी संशोधन करणे आवश्यक आहे. आपण सर्व संशोधकांनी यादृष्टिने संशोधन करावे, जेणे करुन शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे. सकल घरेलू उत्पादनात योगदान कमी मात्र शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या अधिक अशी परिस्थिती आहे, ही परिस्थिती बदलण्यासाठी शेतीवर आधारीत उद्योगात गुंतवणूक व त्यापासून मिळणारे उत्पादन वाढवायला हवे. त्यासाठी ग्रीन हायड्रोजन, बायो डीजल यासारख्या उत्पादनांकडे शेतकऱ्यांनी वळावे, आणि शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता न होता उर्जादाता ही व्हावे, असे आवाहन श्री. गडकरी यांनी केले.
विदर्भात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविणे हे माझ्या जीवनाचे मिशन आहे. त्यासाठी शेतीतून अधिकाधिक उत्पादन कसे मिळेल यासाठी मी स्वतः प्रयोग करीत असतो. विद्यापीठानेही याच क्षेत्रात योगदान द्यावे. शिकून तयार झालेल्या युवकांनी नोकरी देणारे व्हावे. कृषी क्षेत्राशी निगडीत नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा आणि कृषी आधारीत उद्योग निर्माण करा,असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी विद्यापीठाचे अहवाल वाचन केले. त्यानंतर पदवीदान सोहळा झाला. प्रमुख अतिथी असलेले डॉ. मदान यांनीही आपले मार्गदर्शन केले. कुलपतींनी हा सोहळा समाप्त होत असल्याची घोषणा केल्यानंतर पसायदान व राष्ट्रगिताने समारंभाची सांगता झाली.