07.06.2023: लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे योगदान सह्याद्री पर्वताएवढे महान : राज्यपाल
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे योगदान सह्याद्री पर्वताएवढे महान : राज्यपाल रमेश बैस
राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत बाळासाहेब देसाई यांच्यावरील चरित्र ग्रंथाचे प्रकाशन संपन्न
आपल्या प्रदीर्घ राजकीय जीवनात राज्याच्या विकासाचा आलेख उंचावणारे राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे राज्यासाठी योगदान हे सह्याद्री पर्वताएवढे महान होते. महाराष्ट्राला देशातील अग्रणी राज्य बनविण्यात त्यांची भूमिका महत्वाची असल्यामुळे त्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनावरील ‘दौलत’ (बाळासाहेब देसाई : व्यक्तित्व ..कर्तृत्व ..नेतृत्व’) या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि. ७) राजभवन मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादाजी भुसे, मंत्री गुलाबराव पाटील, ग्रंथाचे संपादक ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, अनेक आमदार व लोकप्रतिनिधी, देसाई कुटुंबीय व इतर मान्यवर उपस्थित होते.
आईच्या छत्राविना लहानाचे मोठे झालेले बाळासाहेब देसाई एक मेधावी विद्यार्थी होते. आपल्या अंगभूत गुणांनी व परिश्रमांनी ते उत्तम वकील झाले व पुढे सातारा जिल्हा बोर्डाचे अध्यक्ष झाले. पाटण येथून अनेकदा आमदार झालेले बाळासाहेब देसाई यांनी मुख्यमंत्री पद सोडल्यास राज्यात सर्वच महत्वाची खाती यशस्वी रित्या सांभाळली होती असे सांगून बाळासाहेब देसाई यांनी राज्यात एका मजबूत संसदीय लोकशाहीचा पाया रचला, असे राज्यपालांनी सांगितले.
‘दौलत’ हा ग्रंथ बाळासाहेब देसाई यांच्या जीवनातील प्रसंग व घटनांवर आधारित ग्रंथ अद्भुत झाला आहे असे सांगून राज्यपालांनी मंत्री शंभूराज देसाई यांचे अभिनंदन केले तसेच संपादक मधुकर भावे यांच्या कार्याचे कौतुक केले. बाळासाहेब देसाई ‘राज्याचे लोहपुरुष’ होते असे सांगून त्यांच्या जीवन कार्यावरील प्रकरण पाठ्यपुस्तकात समाविष्ट केले जावे असे राज्यपालांनी सांगितले.
बाळासाहेब देसाई यांनी प्रत्येक खात्यात ऐतिहासिक कामगिरी केली व क्रांतिकारक निर्णय घेतले असे सांगून त्यांचा चरित्र ग्रंथ भावी पिढ्यांसाठी सच्ची ‘दौलत’ सिद्ध होईल असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
बाळासाहेब देसाई यांनी गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्याचा, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे स्थापन करण्याचा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे गेटवे ऑफ इंडिया आणि शिवाजी पार्क येथे स्थापन करण्याचे ऐतिहासिक निर्णय घेतले असे सांगून बाळासाहेब देसाई यांना मरणोपरांत पद्मश्री पदवी दिली जावी अशी अपेक्षा मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.
बाळासाहेब देसाई यांचे मुळे वरळी येथे पोलिसांसाठी १२०० क्वार्टर्स तयार झाले व शिवाजी महाराजांचे दोन्ही पुतळे त्यांनी लोकवर्गणीतून उभे केले असे पुस्तकाचे संपादक मधुकर भावे यांनी सांगितले.