बंद

    07.04.2022: स्त्रीशक्ती सोबतच मातृभाषा व मातृभूमीचा देखील सन्मान व्हावा : राज्यपाल

    प्रकाशित तारीख: April 7, 2022

    विमेन ग्रॅज्युएट्स युनिअनतर्फे राजभवन येथे स्त्रीशक्तीचा सन्मान
    स्त्रीशक्ती सोबतच मातृभाषा व मातृभूमीचा देखील सन्मान व्हावा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    विद्यापीठांमध्ये महिला स्नातकांची संख्या पुरुषांपेक्षा वाढत आहे. सुवर्ण पदक प्राप्त करणाऱ्या मुलींची संख्या ८० टक्क्यांच्या वर आहे. काही वर्षांनी भारतीय प्रशासन व पोलीस सेवेत देखील महिला अधिकाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांवर जाईल. मातृशक्तीचा पुनश्च जागर होत असताना मातृभाषा व मातृभूमीचा देखील सन्मान वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    मुंबईतील १०७ वर्षे जुनी असलेल्या विमेन ग्रॅज्युएट्स युनिअन (महिला स्नातक संघ) या संस्थेतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा तसेच संस्थेच्या आजी माजी विश्वस्त व अध्यक्षांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे गुरुवारी (दि. ७) सत्कार करण्यात आला त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

    व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा ऍड गौरी छाब्रिया व माजी अध्यक्ष हवोवी गांधी उपस्थित होत्या.

    भारतात प्राचीन काळापासून मातृशक्तीला महत्व दिले आहे. अनेक प्रांतात लोक देशाला पितृभूमी म्हणतात परंतु भारतात लोक मातृभूमी शब्द वापरतात. आईकडून उत्तम संस्कार मिळाले तरच उत्तम पिढी तयार होते. पूर्वी महिलांना महत्वाचे स्थान होते त्यावेळी देशाने सुवर्णयुग पाहिले. कालांतराने महिलांना अवमानित केले गेले व अन्यायकारक रीतीने वागविले गेले. त्यामुळे देशाचे अधःपतन झाले. आज स्त्रीशक्तीचा पुनश्च जागर होत आहे. मातृशक्तीचे सहकार्य लाभल्यास देश पुन्हा जगतगुरु होईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

    यावेळी राज्यपालांच्या हस्ते डॉ आयेशा सुनावाला, पत्रकार तबस्सुम बारनगरवाला, डॉ सपना रामाणी सलढाणा, डॉ प्राजक्ता आंबेकर, सिमरन अहुजा, सुनीता भुयान, महिला स्नातक परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ सुधा पाध्ये, दोलत कोतवाल, प्रा.सबिता चुगाणी, शैला शास्त्री, माजी अध्यक्षा नंदिता सिंह, महिला पदवीधर संघाच्या विश्वस्त काश्मिरा मेहेरहोमजी अध्यक्षा अ‍ॅड. गौरी छाब्रिया, हवोवी गांधी, डॉ गिरधर लुथरिया, आशिष सिंह, राजश्री त्रिवेदी व ऍड निर्मला सामंत प्रभावळकर यांचा सत्कार करण्यात आला.

    यावेळी गायिका व व्हायोलिनवादक सुनीता भुयान यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. महिला स्नातक संघातर्फे काम करणाऱ्या महिलांना हॉस्टेल तसेच शिक्षण शिष्यवृत्ती दिली जात असल्याचे गौरी छाब्रिया यांनी सांगितले.