बंद

07.03.2025: बेल्जियमच्या राजकुमारी अ‍ॅस्ट्रिड यांनी घेतली राज्यपालांची भेट

प्रकाशित तारीख: March 7, 2025
07.03.2025: राज्यपालांनी  बेल्जियमच्या राजकुमारी अ‍ॅस्ट्रिड यांचे राजभवन येथे स्वागत केले

बेल्जियमच्या राजकुमारी अ‍ॅस्ट्रिड यांनी घेतली राज्यपालांची भेट

गेल्या दहा वर्षातील भारताची प्रगती नेत्रदीपक: राजकुमारी अ‍ॅस्ट्रिड

भारताशी संरक्षण, हरित ऊर्जा, पर्यटन, सांस्कृतिक सहकार्य वाढविण्याबाबत झाली चर्चा

उद्योग व व्यापार जगताच्या ३०० सदस्यांच्या शिष्टमंडळासह भारत भेटीवर आलेल्या बेल्जियमच्या राजकुमारी अ‍ॅस्ट्रिड यांनी एका मंत्रीस्तरीय शिष्टमंडळासह महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची शुक्रवारी (दि. ७ मार्च) राजभवन, मुंबई येथे भेट घेतली.

आपण दहा वर्षांनी भारतात येत असून या कालावधीत देशाने नेत्रदीपक प्रगती केली असल्याचे उदगार यावेळी राजकुमारी अ‍ॅस्ट्रिड यांनी काढले.

नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेसह संरक्षण व परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी फलदायी चर्चा झाल्याचे सांगून आपल्या भेटीत संरक्षण सहकार्य, व्यापार, राजकारण व सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

भारत व बेल्जीयम विश्वासार्ह देश असून आपला देश भारताच्या यशाला हातभार लावण्यास उत्सुक असल्याचे अ‍ॅस्ट्रिड यांनी सांगितले.

बेल्जीयमच्या अनेक कंपन्या भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात पूर्वीपासूनच कार्यरत असून या कंपन्यांनी राज्यात रोजगाराच्या हजारो संधी निर्माण केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना बेल्जीयमचे उपपंतप्रधान मॅक्सिम प्रिव्हो यांनी भारताकडे मुबलक कुशल मनुष्यबळ असल्याचे सांगून उभय देशांमधील व्यापार वाढवण्यासाठी व्यापारासह कुशल मनुष्यबळाची देखील देवाण घेवाण झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

भारत केवळ मोठी लोकशाही व अर्थसत्ता नसून आज जागतिक राजकारणातील महत्वाचा देश असल्याचे त्यांनी सांगितले.

बेल्जीयम भारताला सेमीकंडक्टर, जीव विज्ञान, अवकाश, पायाभूत सुविधा विकास, हरित ऊर्जा आदी क्षेत्रात देखील सहकार्य करू शकतो असे त्यांनी सांगितले. बेल्जीयम मधील अँटवर्प हे बंदर युरोपचे प्रवेशद्वार असून भारताला ते अतिशय उपयुक्त ठरेल असे त्यांनी सांगितले.
बेल्जीयम मधील फ्लान्डर्स प्रांताचे वित्त व अर्थसंकल्प मंत्री मथायस डिपेंडेल यांनी देखील यावेळी बोलताना आपल्या प्रांताचे महाराष्ट्राशी सहकार्य वाढविण्याबाबत उत्सुकता दाखवली. जवळपास अर्धातास चाललेल्या या बैठकीमध्ये उभयपक्षी पर्यटन तसेच सांस्कृतिक संबंध वाढविण्यावर देखल चर्चा झाली.

यावेळी राजकुमारी अ‍ॅस्ट्रिड यांचे राज्याच्या वतीने स्वागत करताना राज्यपालांनी नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ व वाढवण बंदराचे काम पूर्ण झाल्यावर भारताचा बेल्जीयमशी व्यापार आणखी वाढण्यास मदत होईल असे सांगितले. महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंतीचे राज्य असून बेल्जीयमच्या कंपन्या राज्यात काम करीत आहेत तसेच भारताचा देखील बेल्जीयमशी हिऱ्याचा व्यापार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताचे संरक्षण क्षेत्र सहकार्यासाठी खुले झाले असून या क्षेत्रात बेल्जीयमने सहकार्य करार करावे असे राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक गडकिल्ले, अजंता वेरूळ सारख्या लेणी व इतर पर्यटन स्थळे असून बेल्जीयमने पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढवावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी राज्यपालांनी राजकुमारी अ‍ॅस्ट्रिड यांना बेल्जीयमच्या राजघराण्यातील सदस्यांच्या राजभवन येथे यापूर्वी झालेल्या भेटींची छायाचित्रे असलेला अल्बम भेट दिला.

बैठकीला बेल्जियमचे भारतातील राजदूत डिडिएर व्हँडरहॅसेल्ट, मुंबईतील वाणिज्यदूत फ्रँक गीरकेन्स, राजकुमारीचे सल्लागार डिर्क वाउटर्स आणि ब्रेंट व्हॅन टॅसल उपस्थित होते. बैठकीनंतर राज्यपालांनी राजकुमारी अ‍ॅस्ट्रिड तसेच त्यांच्या शिष्टमंडळाला राजभवनातील समुद्र किनारा दाखवला.