06.12.2022 : डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित वंचितांचा स्वाभिमान जागविला : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
महापरिनिर्वाण दिन
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित वंचितांचा स्वाभिमान जागविला : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
इंदू मिल येथे जगाला हेवा वाटावा असे स्मारक लवकरच : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
डॉ आंबेडकरांनी देशाला जगाच्या पाठीवरचे सर्वोत्तम संविधान दिले : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह मंगळवारी (दि. ६) चैत्यभूमी येथे डॉ आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.
यावेळी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री मंगल प्रभात लोढा, दिपक केसरकर व संजय राठोड तसेच प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, लोकप्रतिनिधी, भन्ते राहुल बोधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील गरीब, उपेक्षित व वंचित देशबांधवांमध्ये स्वाभिमान जागविला. त्यांचे समता – समानतेचे स्वप्न आज साकार होताना दिसत आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक आपण भारतीय असल्याचा सार्थ अभिमान बाळगत आहे, असे राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी झालेल्या सभेत सांगितले. अनेक देशातील राजदूत आपणांस ज्यावेळी भेटतात त्यावेळी ते भारत लवकरच जगातील पहिल्या क्रमांकाचे राष्ट्र होईल असा विश्वास व्यक्त करतात, असे त्यांनी सांगितले. डॉ आंबेडकर यांनी अनेक क्षेत्रांमध्ये अद्भुत असे योगदान दिले आहे, परंतु जनसामान्यांना आत्मभान देणे हे त्यांचे सर्वात मोठे कार्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील लोकांना सशक्त केले, त्यांची न्यूनगंडाची भावना काढून टाकली व स्वाभिमानाची फुंकर घालून इतिहास बदलला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. इंदू मिल येथे जगाला हेवा वाटावा असे डॉ आंबेडकर यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण केले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. शासनाच्या विविध कल्याणकारे योजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली.
क्रांतिसूर्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे असे सांगून देशाला जगाच्या पाठीवरचे सर्वोत्तम असे संविधान देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचे व लोकशाहीचे राज्य आणले असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. संविधानामुळे देशातील लोकशाही जिवंत राहिली असे सांगून इंदू मिलच्या जागेवर डॉ आंबेडकर यांचे अतिभव्य स्मारक लवकरच पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.
सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्रिशरण बुद्धवंदना म्हणण्यात आली. त्यानंतर मुंबई महानगर पालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावरील छायाचित्रांच्या प्रदर्शनाला राज्यपालांनी भेट दिली तसेच काही दृष्टिहीन शालेय विद्यार्थिनींना भेटवस्तूंचे वाटप केले.