बंद

    05.09.2022: त्रिवर्ष पूर्तीनिमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या ३ पुस्तकांचे प्रकाशन संपन्न

    प्रकाशित तारीख: September 5, 2022

    त्रिवर्ष पूर्तीनिमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या ३ पुस्तकांचे प्रकाशन संपन्न

    राजभवन अधिक लोकाभिमुख करणे ही काळाची गरज – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    महाराष्ट्र हे असंख्य प्रेरणास्थाने असलेले राज्य आहे. या भूमीने एकीकडे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशी संतांची मांदियाळी दिली आहे, तसेच दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे ओजस्वी नेते दिले आहेत. आज भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होत असताना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीसाठी आपण काय करू शकतो याचा विचार करणे गरजेचे आहे. या दृष्टीने राजभवन अधिक लोकाभिमुख करणे ही काळाची गरज आहे , असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    राज्यपाल कोश्यारी यांच्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरील तीन वर्षांच्या कार्यावर आधारित ‘त्रैवार्षिक अहवाल’ या कॉफी टेबल पुस्तकाचे तसेच इतर दोन पुस्तकांचे प्रकाशन सोमवारी राजभवन येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल पदावर तीन वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

    उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य तसेच माजी खासदार विजय दर्डा यांच्या उपस्थितीत ‘लोकनेता भगतसिंह कोश्यारी’ या चरित्रात्मक मराठी पुस्तकाचे तसेच राज्यपालांच्या २७ निवडक भाषणाचे संकलन असलेल्या ‘राज्यपाल के रूप में भगत सिंह कोश्यारी के चुनिंदा भाषण’ या हिंदी पुस्तकाचे देखील यावेळी प्रकाशन करण्यात आले.

    राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर जसे आपण नतमस्तक झालो तसे राजमाता जिजाऊंच्या जन्मगावी सुद्धा आपण जाऊन आलो. नंदुरबार मधील लहानश्या गावी लोकांमध्ये राहिलो तसेच करोना काळात राज्य बाहेर आल्यावर असंख्य करोना योद्ध्यांचा राजभवनावर सन्मान केला. एका जरी गरीब – गरजू व्यक्तीच्या आपण कामात आलो तर ते पुण्य कार्य ठरेल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

    सार्वजनिक जीवनात आल्यापासून आपण लोकांना आपला कार्य अहवाल सादर केला. या कार्य अहवालाच्या परंपरेचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी कौतुक केले होते व असा अहवाल इतर राज्यपालांनी देखील काढावा अशी सूचना केली होती अशी आठवण राम नाईक यांनी यावेळी केली.

    लोकशाहीत राज्यपालांची भूमिका कशी असावी, हे दाखवणारे कोश्यारी लोकराज्यपाल असल्याचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी सांगितले. उत्तर पूर्व प्रदेशाबद्दल देशातील लोकांना फार कमी माहिती आहे याबद्दल खंत व्यक्त करताना या आठ राज्यातील देशातील लोकांना प्रेम देणे आपले कर्तव्य आहे असे त्यांनी सांगितले.

    महाराष्ट्राने अनेक राज्यपाल पहिले परंतु चांदा ते बांदा असे संपूर्ण राज्य भ्रमण करून लोकांना आपलेसे करणाऱ्या भाषाप्रेमी राज्यपाल कोश्यारी यांना इतिहासाच्या पानांमध्ये विशेष स्थान असेल असे विजय दर्डा यांनी यावेळी सांगितले.

    यावेळी ‘लोकनेता भगतसिंह कोश्यारी’ या पुस्तकाचे लेखक रविकुमार आराक, भाषणांच्या संकलन कर्त्या डॉ मेधा किरीट, चाणक्य प्रकाशन संस्थेचे डॉ अमित जैन, माजी खासदार किरीट सोमैया, उद्योगपती अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर, जाहिरात व नाट्य क्षेत्रातील भरत दाभोळकर आदी उपस्थित होते.

    पुस्तक पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे
    https://online.fliphtml5.com/rvwmg/xtou/index.html