05.08.2022: दृष्टिहीन महिलांचे राज्यपालांना रक्षाबंधन
दृष्टिहीन महिलांचे राज्यपालांना रक्षाबंधन
‘मदत नको तर समाजाकडून सहकार्य हवे’ हा दिव्यांगांचा विचार सकारात्मक : राज्यपाल
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या नेत्रहीन महिलांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन रक्षाबंधनानिमित्त त्यांना राखी बांधली. राज्यपालांनी सर्व दिव्यांग महिलांना शुभेच्छा देताना स्वतःच्या वतीने ओवाळणी भेट दिली.
नेत्रहीन व्यक्तींना दृष्टी नसते. परंतु ईश्वर त्यांना त्या ऐवजी काहीतरी विशेष गुण देतो असे सांगून आज नेत्रहीन व्यक्ती यशस्वी उद्योजक, क्रीडापटू तसेच इतरही क्षेत्रात अग्रणी राहून आत्मनिर्भर झाल्याचे पाहायला मिळते असे राज्यपालांनी सांगितले. सहानुभूती किंवा मदत नको तर समाजाकडून सहकार्य हवे आहे हा दिव्यांग लोकांचा विचार अतिशय सकारात्मक आहे असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमंत टकले यांनी नॅबच्या कार्याची माहिती दिली. अंध महिलांनी या वर्षी पंजाब मधील वाघा आणि अटारी सीमेवर जाऊन आपल्या जवानांना राखी बांधल्याचे मानद सचिव पूजा ओबेरॉय यांनी सांगितले.
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड ही संस्था नेत्रहीन व्यक्तींच्या शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसनासाठी कार्य करते. संस्थेच्या महिला सक्षमीकरण विभागातर्फे महिलांना राखी व तोरण तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.