05.02.2025: शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण, तंत्रज्ञान, संशोधनाचा वापर करा – राज्यपाल

शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी
शिक्षण, तंत्रज्ञान, संशोधनाचा वापर करा
– राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
अकोला, दि. 5 : कृषी पदवीधरांनी शिक्षण, तंत्रज्ञान, संशोधन यांचा वापर शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व शेती क्षेत्राच्या प्रगतीसाठी करावा, असे प्रतिपादन विद्यापीठ कुलपती तथा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३९ वा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. प्रतिकुलपती तथा राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, कर्नाटक कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष अशोक दलवाई, कुलगुरू डॉ. शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, आमदार अमोल मिटकरी, आमदार हरिश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. समारंभात विविध विद्याशाखांच्या एकूण ४ हजार ४० स्नातकांना विविध पदव्या प्रदान करण्यात आल्या.
राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले की, ज्ञान मिळवणे ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. देशाच्या कृषी क्षेत्राला अधिकाधिक प्रगत करण्याची जबाबदारी नवपदवीधरांना पार पाडायची आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बीजनिर्मिती, पशुधन विकास, आदर्श ग्राम प्रकल्प अशा उपक्रमांबरोबरच नवनव्या अभ्यासक्रमातून अनेक विद्याशाखांचा विकास केला आहे.
ते पुढे म्हणाले की, ज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताची झेप जगभरात देदिप्यमान ठरली आहे. औद्योगिक क्षेत्राबरोबरच कृषी क्षेत्रातही तितकीच उल्लेखनीय प्रगती करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञानप्राप्ती, त्याचे उपयोजन व करावयाचे कार्य याबाबत निश्चित ध्येय ठरवून त्यानुसार वाटचाल करावी.
शेतीसाठी नवतंत्रज्ञानाचा वापर : कृषी मंत्री श्री. कोकाटे
कृषी मंत्री श्री. कोकाटे म्हणाले की, जगभरात विविध क्षेत्रांत अनेकविध बदल होत असून, त्यानुसार कृषी क्षेत्रातही बदल घडवणे आवश्यक आहे. शेतीच्या उत्पादनखर्चात कपात व उत्पन्नात वाढ यासाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शासन पावले उचलत आहे. ‘एआय’सारख्या नवतंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
संशोधनाची दिशा पर्यावरण संवर्धक असावी : श्री. दलवाई
श्री. दलवाई म्हणाले की, शाश्वत विकासासाठी कृषी उत्पादन प्रणालीची पुनर्रचना करतानाच कृषी पर्यावरणशास्त्र आणि सेंद्रिय शेतीची सांगड घातली पाहिजे. जैवविविधतेची जपणूक, विषमुक्त व सुरक्षित अन्ननिर्मिती, मृद संवर्धन, जलसंवर्धन होणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषी पर्यावरण व सेंद्रिय शेतीशास्त्र डोळ्यांसमोर ठेवून त्या दृष्टीतूनच कृषी संशोधन पुढे जावे. एकविसाव्या शतकातील संशोधनाची दिशा पर्यावरण संवर्धक असावी, असे आवाहन त्यांनी केले.
कुलगुरू डॉ. गडाख यांनी प्रास्ताविकात विद्यापीठातील उपक्रमांची माहिती दिली. समारंभात विविध विद्याशाखांच्या एकूण ४ हजार ४० स्नातकांना विविध पदव्या प्रदान करण्यात आल्या. २५ स्नातकांना कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी आदी विषयांतील पीएच. डी. प्रदान आली.
संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी डॉ. श्यामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, जनसंपर्क अधिकारी किशोर बिडवे, डॉ. नितीन कोष्टी आदी उपस्थित होते.
०००