बंद

    04.10.2024: जिल्ह्यातील कृषी, सिंचन, औद्योगिक विकासाला प्राधान्य देणार – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

    प्रकाशित तारीख: October 4, 2024
    04.10.2024 : राज्यपालांची बुलढाणा येथे लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा

    जिल्ह्यातील कृषी, सिंचन, औद्योगिक विकासाला प्राधान्य देणार
    – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
    राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, उद्योजक, खेळाडू आणि पत्रकारांसोबत राज्यपालांचा संवाद
    > जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी विशेष मोहीम राबवावी
    > शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकत्रितपणे काम करावे
    > बुलढाण्यातील सिंचन प्रकल्पांना निधी देण्याची शासनाला सूचना

    बुलढाणा, दि. ४ (जिमाका) : जिल्ह्यात रस्ते, दळणवळण व्यवस्था, पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. जिल्ह्यातील कृषी, सिंचन, औद्योगिक विकासाला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.
    राज्यातील विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असलेले राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे शुक्रवारी बुलढाण्यात आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, उद्योजक, पत्रकार, खेळाडू आणि सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करुन शासनाच्या उपाययोजना सांगितल्या. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण, आयुष (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात , पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, माजी मंत्री सुबोध सावजी, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, राहूल बोंद्रे, नानाभाऊ कोकरे, विविध राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
    राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, बुलढाणा जिल्ह्याचा औद्योगिकदृष्ट्या विकास करण्यासाठी जिल्ह्यात उद्योग वाढले पाहिजेत. जिल्ह्यात उद्योग प्रकल्प सुरु होणे गरजेचे असून त्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना राज्य शासनाला करणार आहे. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात उद्योगासाठी जागा दिली जात आहे. स्थानिकांना उद्योग सुरु करण्याची संधी आहे. उद्योगातून जिल्ह्याचे सकल उत्पन्न वाढीस मदत होईल. तसेच मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असेही राज्यपालांनी सांगितले.
    शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकत्रितपणे काम करावे
    मी एक शेतकरी कुटुंबातील आहे. शेतकरी आत्महत्येबाबत राज्य शासन गांभीर्याने उपाययोजना करीत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मुळ कारण शोधून उपाययोजना करणे गरजेचे आहे.
    शेतकऱ्यांचे समुपदेशन केले जात आहे. त्यासाठी मोबाईल क्लिनिक सुरु केले आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकत्रितपणे काम करावे, अशा सूचना राज्यपाल राधाकृष्णन यांनी केल्या. तसेच शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बी- बियाणे उपलब्ध होण्यासाठी तपासणी, दर्जाबाबत कडक कारवाई करण्याच्या सूचना केंद्र सरकार केल्या जातील, असे राज्यपाल यावेळी म्हणाले.
    बुलढाण्यातील सिंचन प्रकल्पांना निधी देण्याच्या सूचना शासनाला देणार
    जीगाव सिंचन प्रकल्प हा जिल्ह्यातील सिंचन क्षमता पूर्ण करणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प टप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. पहिला टप्पा पूर्णत्वास येत आहे. जिल्ह्यातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी जीगाव, वैनगंगा- नळगंगा नदीजोड सिंचन प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याच्या राज्य शासनाला सूचना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
    जिल्ह्यातील निर्यातदारांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. निर्यातदारांना देयकांसाठी मुंबईच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे या देयकांसाठी स्टेट बॅकेची एक सेल सुरु करण्यासाठी केंद्र सरकारला सूचना पाठवल्या जातील.
    बुलढाणा जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा रुग्णालयात रुग्णांना सुविधा दिल्या जात आहेत. पुरवठ्याच्या तुलनेत डॅाक्टर्सची मागणी मोठ्याप्रमाणात आहे. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय महत्त्वाचे आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात दिव्यांगाना सर्व सुविधा देण्यासाठी विशेष केंद्र सुरु करण्यात आले असून त्याचा लाभ घ्यावा. खेळाडूंसाठी जिल्हा नियोजन आराखड्यात निधीची तरतूद करावी. खामगांव- जालना रेल्वे मार्गासह शेगाव- पुणे रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, अशा सूचना देखील राज्यपाल यांनी यावेळी दिल्या.
    माझी लाडकी बहीण योजना सर्वाधिक यशस्वी
    राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने सुरु केलेली माझी लाडकी बहीण योजना सर्वाधिक यशस्वी ठरल्याचे मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विविध घटकांशी संवाद साधतांना व्यक्त केले.
    जिल्ह्यातील विविध घटकांशी चर्चा केल्यानंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन पुढील नियोजित कार्यक्रमासाठी अकोलाकडे रवाना झाले.