बंद

    04.10.2021 : अर्जेंटिनाच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: October 4, 2021

    अर्जेंटिनाच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

    अणुउर्जेसह व्यापार, पर्यटन व सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यास अर्जेंटिना उत्सुक : ह्यूगो जेवियर गोबी

    अर्जेंटिना भारताशी अणुऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात सहकार्य करीत असून व्यापार, संस्कृती आणि पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास उत्सुक असल्याचे अर्जेंटिनाचे भारतातील राजदूत ह्यूगो जेवियर गोबी यांनी आज येथे सांगितले.

    राजदूत ह्यूगो जेवियर गोबी यांनी सोमवारी (दि. ४ ऑक्टो) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

    भारताप्रमाणेच अर्जेंटिना देखील विलक्षण सुंदर देश आहे. मात्र २०१९ साली अर्जेंटिनाच्या २ दशलक्ष पर्यटकांपैकी केवळ १४००० पर्यटक भारतात आले तर भारताच्या १३ दशलक्ष पर्यटकांपैकी अवघे ८००० पर्यटक अर्जेंटिना पाहण्यास आले. हे चित्र बदलून उभय देशातील परस्परांच्या पर्यटकांची संख्या वाढली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

    मेसीचे चाहते भारतात अधिक : राज्यपाल

    भारतात पर्यटनाच्या अनेक संधी असून अर्जेंटिनाने पर्यटन वाढविण्यासाठी सहकार्य करावे असे राज्यपाल कोश्यारी यांनी राजदूतांना सांगितले. फ़ुटबाँल भारतात लोकप्रिय खेळ असून अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटू मेसीचे चाहते अर्जेंटिना पेक्षा भारतात अधिक असल्याचे तसेच दंतकथा झालेले दिएगो मॅराडोना हे नाव सर्वतोमुखी असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    बैठकीला अर्जेंटिनाचे मुंबईतील वाणिज्य दूत गिलर्मो एड्युआर्दो डेव्होतो, उपवाणिज्य दूत सिसिलिया मोनिका रिसोलो, अर्जेंटिना दूतावासातील राजकीय विभाग प्रमुख रेनाटो मोरालेस हे उपस्थित होते.