04.09.2024: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण
उदगीर जि.लातूर, दिनांक ४ : उदगीर येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते आज लोकार्पण झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, विशेष अतिथी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सर्वश्री आमदार विक्रम काळे, रमेश कराड, अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचीही उपस्थिती होती.
सुरूवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते कोनशिलेचे अनावरण, फीत कापून विहाराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती यांनी विहारातील गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बुद्ध वंदना झाली. वंदनेनंतर उपस्थित बौद्ध भिक्कूंना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चिवर दान केले. बौद्ध भिक्कू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गौतम बुद्धांची मूर्ती भेट दिली. क्रीडा मंत्री बनसोडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
विहाराची वैशिष्ट्ये :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते आज लोकार्पण झालेले उदगीर येथील विहार कर्नाटक येथील कलबुर्गीच्या बुद्ध विहाराची प्रतिकृती आहे. एक हेक्टर १५ आर जागेवर या विहाराची उभारणी करण्यात आली आहे. विहारात १२०० अनुयायांची बैठक व्यवस्था असलेले ध्यान केंद्र तयार करण्यात आले आहे. विहार परिसरात प्रवेश करण्यासाठी एक मुख्य प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे. या प्रवेशद्वाराची रचना बिहारमधील सांची स्तूपाप्रमाणे करण्यात आली आहे.