04.08.2022 : नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी शतकोत्तर महोत्सवाचे थाटात उद्घाटन
दर्जेदार शिक्षणाचे केंद्र नागपूर विद्यापीठ व्हावे – भगत सिंह कोश्यारी
नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी शतकोत्तर महोत्सवाचे थाटात उद्घाटन
नागपूर दि. 4 : देशाच्या हृदयस्थानी असणाऱ्या नागपूर विद्यापीठाने आपल्या दिप्यमान इतिहासात अनेक महापुरुषांना, महान व्यक्तिमत्त्वांना घडविले आहे. यापुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची ओळख दर्जेदार शिक्षणाचे केंद्र म्हणून सर्वत्र व्हावी, अशा शुभेच्छा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे दिल्या.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतकोत्तर महोत्सवाचे आज गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात उद्घाटन करण्यात आले. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला सुप्रसिध्द वैज्ञानिक, होमी बाबा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती अनिल काकोडकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी प्र कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव राजू हिवसे उपस्थित होते.
भारताच्या हृदय स्थानी असणाऱ्या नागपूर शहरांमध्ये नागपूर विद्यापीठाची स्थापना शंभर वर्षांपूर्वी 4 ऑगस्ट 1923 मध्ये झाली. या विद्यापीठातून देशाच्या विकासात हातभार लावणारे मान्यवर पुढे आले आहेत. त्या विद्यापीठाच्या उद्घाटन सोहळ्याला भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात उपस्थित राहिल्याचे समाधान असल्याचे यावेळी राज्यपालांनी सांगितले.
100 वर्ष एखादी संस्था विद्यादानाचे काम करते हे अतिशय प्रेरणादायी आहे.या भूतकाळातून नव्या भविष्याचा आराखडा आम्हाला तयार करायचा आहे. या विद्यापीठातून देशाचा गौरव वाढवणारे नामवंत तयार झाले आहेत. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात असणारे रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला घडविणारे हे ज्ञानपीठ आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख त्यांनी केलेल्या दर्जेदार महामार्गांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात झाली असल्याचे आवर्जून सांगितले. नागपूरचे गडकरी हे रोडकरी आहेत, असे सन्मानाने देशभरात म्हटले जाते. आपल्या शहराची ओळख त्या ठिकाणच्या संस्था, त्या ठिकाणचे व्यक्तिमत्व तयार करीत असते. त्यामुळेच नागपूर विद्यापीठ हे दर्जेदार शिक्षणाचे केंद्र कायम राहील याकडे जागृतपणे लक्ष ठेवा, तसे प्रयत्न करा,असे आवाहन त्यांनी केले.
देशाच्या अन्य प्रांतांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यापीठाची नावे संतांच्या नावाने असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना आपण प्रयाग मध्ये प्रत्यक्ष ऐकले होते. राष्ट्रसंतांच्या ‘या भारतात बंधुभाव नित्य वसु दे’ या गीताचा उल्लेख करून संतांच्या दूरदृष्टीने कर्तुत्ववान पिढी निर्माण करण्याचे कार्य विद्यापीठाने करावे, आज शतकोत्तर कार्यक्रमांचा शुभारंभ होताना हा संकल्प करूया,असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमासाठी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असलेले जेष्ठ वैज्ञानिक होमी भाभा राष्ट्रीय संस्थाचे कुलपती डॉ. अनिल काकोडकर यांनी आपल्या संक्षिप्त भाषणात विद्यापीठांनी केवळ विद्यार्थीच घडवू नये, तर देश घडविण्याचे दायित्व व भूमिका आपल्याकडे घ्यावी, असे आवाहन केले.
अमेरिकेसारखा देश आपल्या विद्यापीठांच्या संशोधनाने ओळखल्या जातो. यावेळी त्यांनी अमेरिकेतील स्टॅमफोर्ड विद्यापीठाचे उदाहरण दिले. या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नवनवीन संशोधन जगापुढे आणल्यामुळे हजारो स्टार्टअप कंपन्या सुरू झाल्यात. या ठिकाणच्या संशोधनातून अमेरिका जागतिक महासत्ता झाली आहे. अमेरिकेला विद्यापीठांनी घडविले आहे. त्यामुळे विद्यापीठांमधून मानसिकता बदलाचा संकल्प मांडल्या गेला पाहिजे, नवीन काही घडविण्याची मानसिकता तयार करावी लागेल. नवनिर्मितीच्या प्रवृत्तीतून देशासाठी संपत्ती निर्माण करणे व त्यातून सामाजिक नीतिमत्ता निर्माण करणे आज आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर सारख्या मध्यवर्ती शहरात असलेल्या विद्यापीठाने एकीकडे देश आर्थिक सत्ता होत असताना दुसरीकडे देशात वाढलेली आर्थिक विषमता कशी कमी करता येईल, यासाठी ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी संशोधन करावे. विद्यापीठातील संशोधन व त्याचा ग्रामीण भागात केलेला उपयोग यातून ही दरी कमी होऊ शकते. त्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना ही त्यांनी केली. आजचा दिवस केवळ भूतकाळ आठवण्याचा नसून नवे आराखडे बांधण्याचा असल्याचेही आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
नवी दिल्लीमध्ये संसदेच्या कामकाजामुळे उपस्थित न राहू शकलेले केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आपला व्हिडिओ संदेश पाठविला. आपल्या जडणघडणीमध्ये नागपूर विद्यापीठाचे कार्य महत्त्वाचे असून या ठिकाणी एक विद्यार्थी नेता म्हणून आपले करिअर घडल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. विद्यापीठाच्या शतकोत्तर वाटचालीला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
नागपूर विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ‘जीवन साधना पुरस्कार’ 2007 पासून सुरू करण्यात आला आहे.यावर्षीच्या जीवनसाधना पुरस्काराचे मानकरी जागतिक दर्जाचे उद्योजक पुरुषोत्तम अग्रवाल ठरले आहेत. नागपूर विद्यापीठातर्फे शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन त्यांना हा पुरस्कार आज बहाल केला. डॉ,प्रमोद मुनघाटे यांनी त्यांच्या मानपत्राचे वाचन केले. केवळ दहा हजाराच्या कर्जामध्ये ‘जंता फार्मा’ नावाची जागतिक दर्जाची कंपनी पुरुषोत्तम अग्रवाल यांनी उभी केली आहे. विदर्भातील रिसोड या छोट्याशा गावातील पुरुषोत्तम अग्रवाल यांची कंपनी 30 देशात आज औषधीची निर्यात करते. औषधांशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रातही आता अग्रवाल यांनी आपल्या उद्योग व्यवसायाला वाढविले आहे. नागपूर विद्यापीठाचे ते विद्यार्थी आहे.
नागपूर विद्यापीठाचे आजी-माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थ्यांच्या भरगच्च उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी केले प्र कुलगुरू संजय दुबे यांनी आभार मानले. शतकोत्तर उद्घाटन सोहळ्यानंतर वर्षभरात विद्यापीठामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.