बंद

    04.03.2021 : गणेश मंडळांनी तन्मयतेने समाजकार्य सुरु ठेवल्यास यंदा गणेशोत्सव निर्विघ्नपणे करता येईल

    प्रकाशित तारीख: March 4, 2021

    ‘गणेश मंडळांनी तन्मयतेने समाजकार्य सुरु ठेवल्यास यंदा गणेशोत्सव निर्विघ्नपणे करता येईल’:

    राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    राज्यातील गणेशोत्सव मंडळांनी तसेच मंडळांच्या हजारो कार्यकर्त्यांनी करोना काळात समाज हितेशी बनून उत्कृष्ट काम केल्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचले तसेच गोरगरिबांचे जगणे सुगम झाले. करोनाचे आव्हान संपलेले नाही. त्यामुळे गणेश मंडळांनी यापुढेही तन्मयतेने काम सुरु ठेवल्यास बाप्पाच्या कृपेने यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे साजरा करता येईल, असा आशावाद राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.

    गणेशोत्सवाचे विश्वव्यापी संघटन असलेल्या अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाच्या वतीने गुरुवारी (दि. ४) राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील ३० करोना योद्ध्यांचा राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

    कार्यक्रमाला महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर, उपाध्यक्षा मुक्ता टिळक, आमदार आशिष शेलार आणि महासंघाचे राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

    समाज आहे म्हणून आपण आहोत. समाजात आपण जे काही कार्य करतो ते समाजाच्या चांगुलपणामुळे करीत असतो. त्यामुळे समाजासाठी काम करतो त्यावेळी एक प्रकारे आपण स्वतःलाच उपकृत करीत असतो, असे राज्यपालांनी सांगितले. संत तुळशीदास यांच्या दोह्याचा उल्लेख करून परोपकारासाठी वापरले जाते ते जीवन धन्य आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

    राज्यपालांच्या हस्ते यावेळी गणेशोत्सव महासंघ, अहमदनगर जिल्हाप्रमुख दिलीप महादेव शिरसाट, गणेशोत्सव महासंघ सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख, संतोष दिनकर मोर्ये, गणेशोत्सव महासंघ सातारा जिल्हाप्रमुख विनायक जगन्नाथ शिंदे, अविनाश जाधव, अमोद कांरजे, संतोष सुकडे, शिरीष परब, श्रीनिकेतन खानविलकर, सुभाष पवार, शशीकांत तोरस्कर, नितीन खेडेकर, मधुरा श्रीकांत शेडगे, गणेश मोरे, सचिन चव्हाण, दिपक यादव, आत्माराम म्हात्रे, सुबोध नाईक, अक्षय अडिवरेकर, रविंद्र गावडे, अक्षय यादव, सुषमा बेर्डे, रत्नाकर वारधेकर, हरिचंद्र दामोदर अहिरे, गणेश चंद्रकांत गुरव, योग शिक्षक सुनिल कुलकर्णी, सुरेश सरनोबत, राजेंद्र झेंडे, सिताराम वाडेकर, रामनाथ केणी, विकास माने, हनुमंत सावंत व प्रविण आवारी यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

    **