04.02.2025: राज्यपालांच्या हस्ते ६४ व्या कला प्रदर्शनाचे उदघाटन; लक्ष्मण श्रेष्ठ यांना वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार प्रदान
राज्यपालांच्या हस्ते ६४ व्या कला प्रदर्शनाचे उदघाटन; लक्ष्मण श्रेष्ठ यांना वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उदघाटन (कलाकार विभाग २०२४ – २५) राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. ४ ) जहांगीर कलादालन येथे संपन्न झाले.
यावेळी ज्येष्ठ अमूर्त चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना राज्यपालांच्या हस्ते वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये, शाल, श्रीफळ व मानपत्र असे या पुरस्काराचे रूप आहे. शकुंतला कुलकर्णी यांना ज्येष्ठ कलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कला हा इतर प्रत्येक विषयाला समृद्ध करणारा विषय आहे. कला विषयामुळे जाणिवा विस्तारतात, त्यामुळे वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी अथवा इतर व्यावसायिक शिक्षणाला कलेची जोड दिली गेली पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. नव्या शैक्षणिक धोरणानुसार अश्या प्रकारे कला विषय निवडण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याला चित्रकला, स्थापत्यकला व वास्तू निर्माण कलेचा मोठा वारसा लाभला आहे. शिवकालीन गडकिल्ले, भित्तिचित्रे व शिल्पकलेचा देखील वारसा राज्याला लाभला आहे. अश्या कला संपन्न राज्यात कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिक प्रदर्शने आयोजित केली जावी तसेच कलाकारांना दिली जाणारी बक्षीस राशी वाढवली जावी अशी अपेक्षा राज्यपालांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.
मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात देशविदेशातून पर्यटक येतात. अश्यावेळी शहरामध्ये एकाच वेळी अनेक कलाकारांना व्यासपीठ देणारे भव्य बहुमजली कला केंद्र असावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. मुंबईत कला प्रदर्शनासाठी दालनांची संख्या सध्या कमी आहे. ही उणीव दूर करण्यासाठी भव्य व प्रशस्त कला प्रदर्शन कला केंद्र असावे असेही त्यांनी सांगितले.
प्रदर्शनासाठी राज्यभरातील कलाकारांकडून ७७५ कलाकृती प्राप्त झाल्या होत्या; त्यापैकी १४८ कलाकारांच्या १८० कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली अशी माहिती कला संचालक डॉ संतोष क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात दिली.
शकुंतला कुलकर्णी यांच्या वतीने त्यांच्या भगिनी चित्रा पालेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते रेखा व रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण विभाग व दिव्यांग विभाग या प्रवर्गातून १५ कलाकारांना पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, सर ज जी कला अभिमत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रा राजनीश कामत, व प्रदर्शन अधिकारी संदीप डोंगरे व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते सुलेखनकार अच्युत पालव यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले तसेच कला प्रदर्शन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.