बंद

    03.11.2023: दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राज्यपालांनी दिली सत्यनिष्ठा प्रतिज्ञा

    प्रकाशित तारीख: November 3, 2023

    दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राज्यपालांनी दिली सत्यनिष्ठा प्रतिज्ञा

    दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची ‘सत्यनिष्ठा प्रतिज्ञा’ दिली.

    देशाच्या आर्थिक, राजकीय व सामाजिक प्रगती मध्ये भ्रष्टाचार मोठा अडथळा आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी लाच न घेण्याची तसेच न लाच देण्याची, तसेच व्यापक समाज हितासाठी कार्य करण्याची शपथ राज्यपालांनी यावेळी उपस्थितांना दिली.

    राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल यांनी उपस्थितांसमोर राज्यपालांच्या तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदेशांचे वाचन केले.

    भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृतकाळ महत्वाचा आहे. देश भ्रष्टाचार मुक्त झाला तर विकसित भारताचे उद्दिष्ट अधिक लवकर साध्य करता येईल. या दृष्टीने वैयक्तिक तसेच संस्थात्मक स्तरावर पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सचोटीची संस्कृती रुजविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपालांनी आपल्या संदेशातून केले.

    विकसित भारताच्या दिशेने जाताना भ्रष्टाचार मुळापासून नष्ट करणे हे शासनाचे प्रथम उद्दिष्ट आहे. दक्षता जनजागृती सप्ताहामुळे भ्रष्टाचाराची साखळी तोडण्यासाठी नागरिक जागरूक होतील, तसेच भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीत नागरिकांचा सहभाग वाढेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या संदेशातून सांगितले.

    दि. ३0 ऑक्टोंबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत राज्यात दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत असून ‘भ्रष्टाचाराला नाही म्हणा; राष्ट्रासाठी वचनबध्द व्हा’ ही संकल्पना त्यासाठी निश्चित करण्यात आली आहे.