03.07.2022 : इस्कॉनतर्फे आयोजित जगन्नाथ रथयात्रेला राज्यपालांच्या उपस्थितीत शुभारंभ
इस्कॉनतर्फे आयोजित जगन्नाथ रथयात्रेला राज्यपालांच्या उपस्थितीत शुभारंभ
राज्यपालांनी अंधेरी येथे जगन्नाथ रथयात्रेपुढील मार्ग झाडला
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत रविवारी इस्कॉनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ झाला. यावेळी राज्यपालांनी यावेळी जगन्नाथ, बलदेव व सुभद्रा यांच्या रथासमोरील मार्ग स्वतः झाडून रथयात्रेला रवाना केले.
यावेळी इस्कॉनचे मार्गदर्शक गोपालकृष्ण गोस्वामी महाराज, डॉ सूरदास, देवकी नंदन प्रभू, रथयात्रा आयोजन समितीचे अध्यक्ष लखमेंद्र खुराना, पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल मुकुंद माधव प्रभू आदी उपस्थित होते.
इस्कॉनतर्फे आयोजित जगन्नाथ रथयात्रेमध्ये सहभागी होता आले याबद्दल आनंद व्यक्त करताना राज्यपालांनी इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांच्या कार्याचा गौरव केला.
जगन्नाथ हे संपूर्ण विश्वाचे नाथ असल्याचे प्रभुपाद यांनी इस्कॉन चळवळीचा जगभर प्रसार करून सिद्ध केले असे राज्यपालांनी सांगितले. आधुनिक काळात लोकांना वेद, उपनिषदे समजून घेण्यास सवड मिळत नाही. अशावेळी प्रभुपाद यांनी भक्तीचा सोपान मार्ग दाखवला व ‘हरेकृष्णा’ नामाचा जागर केला असे राज्यपालांनी सांगितले.
जातीनिर्मुलनाचे कितीही प्रयत्न होत असले तरी देखील देशात जातीभेद आढळतो. मात्र जगन्नाथाच्या यात्रेसमोर सर्व जातीभेद नष्ट होतात असे प्रतिपादन राज्यपालांनी केले.
जगन्नाथ रथयात्रा अंधेरीतील भक्तिवेदांत स्वामी मिशन शाळेपासून सुरु होऊन इस्कॉन मंदिर जुहू येथे समाप्त होणार आहे.