बंद

    02.12.2024: ‘नीरी’चे अतुल वैद्य यांची एलआयटी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

    प्रकाशित तारीख: December 2, 2024

    ‘नीरी’चे अतुल वैद्य यांची एलआयटी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

    सीएसआयआर ‘नीरी’चे संचालक डॉ अतुल नारायण वैद्य यांची नागपूर येथील लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी डॉ अतुल वैद्य यांची नियुक्ती जाहीर केली आहे. त्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पुर्ण करीपर्यंत (यापैकी जे अगोदर असेल त्या तारखेपर्यंत) करण्यात आली आहे.

    डॉ अतुल वैद्य (जन्म ४ डिसेंबर १९६४) यांनी रसायन अभियांत्रिकी विषयात एलआयटी नागपूर येथून एम एस्सी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पीएच डी प्राप्त केली आहे. सन १९९० पासून त्यांनी ‘नीरी’ येथे कनिष्ठ वैज्ञानिक पदापासून संचालक पदापर्यंत कार्य केले आहे. डॉ वैद्य यांना संशोधन, अध्यापन व प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे.

    एलआयटी विद्यापीठाच्या कुलगुरु पदावर नियुक्ती करण्यासाठी राज्यपालांनी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ आशिष लेले, ‘द इंग्लिश अँड फॉरिन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी हैद्राबादचे माजी कुलगुरु प्रा ई. सुरेश कुमार तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी हे समितीचे सदस्य होते.