02.10.2024: राज्यात आदिवासी विद्यापीठ तर चंद्रपुरात एकलव्य मॉडेल स्कूलची निर्मिती- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन
राज्यात आदिवासी विद्यापीठ तर चंद्रपुरात एकलव्य मॉडेल स्कूलची निर्मिती
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे पोंभुर्णा येथील आदिवासी मेळाव्यात प्रतिपादन
आदिवासी संस्कृती, पारंपरिक नृत्य आणि स्वागताने भारावले राज्यपाल
विविध लाभार्थ्यांना योजनांचा लाभ आणि धनादेश वाटप
चंद्रपूर, दि. 2 : आदिवासी संस्कृती, भाषा आणि कला यांचे जतन करणे महत्त्वाचे असले तरी आदिवासी समाजाच्या स्थायी प्रगतीसाठी सामाजिक, आर्थिक सक्षमीकरण आवश्यक आहे. त्यासाठीच राज्यात आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या 17 टक्के आदिवासी असल्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी आणखी एका एकलव्य मॉडेल स्कुलची निर्मिती करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी दिली.
आदिवासी विकास विभागातर्फे पोंभुर्णा येथे आयोजित आदिवासी मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, पोंभुर्णाच्या नगराध्यक्ष सुलभा पिपरे, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आदी उपस्थित होते.
आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विविध सरकारी योजना आणि कार्यक्रमांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगून राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, आपल्या राज्यातील आदिवासी समाज विविधतेने नटलेला आहे. प्रत्येक समाजाच्या आपल्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, चालीरीती आणि इतिहास आहे. भिल्ल, गोंड-माडिया, कातकरी, कोळी आणि वारली या समुदायांनी आपला समाज समृद्ध केला आहे.
आदिवासींची सांस्कृतिक ओळख, परंपरा आणि वारसा जतन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. आपल्या देशाच्या राष्ट्रपतीपदी एक आदिवासी महिला विराजमान आहे, ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. राज्यपाल या नात्याने मी राज्यातील अनुसूचित क्षेत्रांचा पालकही आहे. आदिवासी कल्याणाच्या केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना अस्तित्वात असून त्याची मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे.
पुढे राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, राज्यात स्थापन होणारे आदिवासी विद्यापीठ हे उत्कृष्ट शिक्षण आणि आधुनिक कौशल्ये प्रदान तसेच आदिवासी समाजासाठी परिवर्तनाचे दीपस्तंभ होईल. या विद्यापीठात एम्स प्रमाणे वैद्यकीय महाविद्यालय, आयआयटी सारखे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय आणि आयआयएम अहमदाबाद सारखी व्यवस्थापन शाळा असेल. हे विद्यापीठ आदिवासी विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देईल. या विद्यापीठात 80 टक्के जागा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील तर 20 टक्के जागा बिगर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असतील, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाचे विशेष अभिनंदन : आदिवासी मेळाव्यानिमित्त माझ्या आदिवासी बंधू-भगिनींना भेटून आनंद झाला, असे राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले. तसेच येथील आदिवासी संस्कृती, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध विभागाच्या योजनांचे आकर्षक स्टॉल्स, सामुदायिक वन हक्क आणि वैयक्तिक वन हक्क उपक्रमांतर्गत धनादेश तसेच जमिनीचे पट्टे वाटप कार्यक्रम, आदिवासी स्वयं-सहायता गटांचा झालेला सन्मान आदिवासी विद्यार्थ्यांचे यश पाहून भारावून गेलो. जिल्हा प्रशासनाने या आदिवासी मेळाव्याचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.
पोंभुर्णा तालुक्याच्या सर्वांगीण विकासात राज्यपालांचे योगदान राहील : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असून आदिवासी बांधवांची प्रगती व्हायला पाहिजे, असा राज्यपालांचा आग्रह आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गावे पेसामध्ये घेण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. त्यासंबंधित फाईलवर स्वाक्षरी करून राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आली असून पोंभुर्णा तालुक्यातील आदिवासी बांधवांचा आणि संपूर्ण तालुक्याचा सर्वांगीण विकासात राज्यपालांचे योगदान राहील, असा विश्वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
समृध्दी महामार्ग पोंभुर्णा पर्यत येणार असून या महामार्गासाठी कोणत्याही शेतक-याचे नुकसान होऊ देणार नाही, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, पोंभुर्णा तालुक्यातील गावांचा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वनधन योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार समाविष्ट झालेल्या गावांना दरवर्षी 25 लक्ष रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेच वनसेवा समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना झटका मशीनसाठी 15 हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मागेल त्याला झटका मशीन देण्यात येईल. पोंभुर्णा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भगवान बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात येईल. बिरसा मुंडा केवळ एक व्यक्ती नाही तर शोषित, वंचित लोकांचा बुलंद आवाज आहे. म्हणूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर हा आदिवासी गौरव दिन म्हणून घोषित केला आहे. तसेच समृद्धी महामार्ग टेंभुर्णी पर्यंत येईल समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्याचे नुकसान होऊ देणार नाही
आदिवासी बांधवांसाठी विविध निर्णय : मिशन शौर्य, तेंदुपत्त्याचा बोनस 20 कोटी वरून 72 कोटी, शहरातील आदिवासींना शबरी घरकुल योजनेचा लाभ, वीर बाबुराव शेडमाके यांच्यावर पोस्ट तिकीट, खावटी कर्ज माफ करण्याचा निर्णय, आदिवासींची 12500 पदे भरण्याचा निर्णय, 3000 आदिवासी गावांना पाच टक्के निधी, माडिया समाजाला घरकुल देण्याचा निर्णय घेतला.
पोंभुर्णा तालुक्याचा सर्वांगीण विकास : पोंभुर्णा तालुक्यात नगर पंचायतची व्हाईट हाऊस प्रतिकृती, रस्ते, राजराजेश्वर मंदिर, तहसील कार्यालय, पंचायत समिती इमारत, अत्याधुनिक वाचनालय, इको पार्क, विश्रामगृह, कार्पेट केंद्र, अगरबत्ती केंद्र, कृषी कार्यालय, स्टेडियम, आय.टी.आय., तलावाचे सौंदर्यीकरण, आठवडी बाजार, भूमापन कार्यालय, ओपन नाट्यगृह, संत जगनाडे सभागृह, मुला – मुलींचे वसतिगृह, धडक सिंचन विहिरीचा कार्यक्रम, प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत, आदींचा विकास करण्यात आला आहे.
पोंभुर्णा तालुक्यात होणार एम.आय.डी.सी. : पोंभुर्णा तालुक्यात एमआयडीसीच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक आणण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे विकास होईल व येथील युवकांना रोजगार उपलब्ध होईल. शेवटच्या वंचित घटकाच्या प्रगतीसाठी आपण पूर्णशक्तीने काम करू, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
विविध लाभार्थ्यांना धनादेश वाटप व योजनांचा लाभ : यावेळी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वनधन योजनेंतर्गत गणेश परचाके, संतोष आलाम यांना प्रत्येकी 25 लाखांचा धनादेश, जनवन विकास योजनेंतर्गत चंद्रशेखर रामटेके, ताईबाई इरसावे, दिवाकर मडावी, वैयक्तिक वनहक्क पट्टे प्रमाणपत्र ब्रम्हदेव जुगनाके, किसनराव कोटनाके यांना तर सामुहिक वनपट्टे वासुदेव गावंडे, लक्ष्मण चिंचोळकर, मनोहर चौधरी यांना, आदिवासी विकास विभागाच्या वतीने एकता पुरुष बचत गटाला ट्रॅक्टरसाठी 3 लक्ष 7 हजार रुपयांचा धनादेश, किराणा दुकानसाठी पल्लवी गेडाम यांना 42500 रुपयांचा धनादेश, परदेशी शिक्षणासाठी अभिजीत टेकाम यांना 52 लक्ष रुपयांची शिष्यवृती धनादेश, लखपती दिदी अंतर्गत माया हळपे, शबरी आवास योजनेअंतर्गत शांतकला शेडमाके आणि पी.एम. आवास योजनेंतर्गत किशोर मडावी यांना धनादेश व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले. संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी तर आभार मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्स यांनी मानले.
000000