बंद

01.11.2022 : कझाकस्थान येथे जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

प्रकाशित तारीख: November 1, 2022

कझाकस्थान येथे जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

कझाकस्थान येथे सप्टेंबर महिन्यात झालेल्या १२ व्या एशियन ऍक्रोबॅटीकस जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत पदकांची लयलूट करणाऱ्या महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक क्रीडापटूंचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी राजभवन येथे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत राज्यातील खेळाडूंनी ५ सुवर्ण, ४ रौप्य व ११ कांस्य पदकांची कमाई केली.

बृहन्मुंबई जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या वतीने आयोज‍ित कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष इंदरजित सिंह राठोड, सचिव आशिष सावंत, खेळाचे संस्थापक महेंद्र चेंबूरकर, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते सुरेश भगत, चेअरमन नीलम बाबर देसाई व संयोजक प्रफुल मोरे प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी सुवर्ण पदक विजेत्या ऋतुजा जगदाळे, प्रिती एखंडे, सोनाली बोराडे, रितिका महावर, अक्षता ढोकले, रौप्य पदक विजेते आकाश गोसावी, आदित्य खसासे व कांस्य पदक विजेते अंचल गुरव, अरना पाटील, निक्षिता ख‍िल्लारे, कुणाल कोठेकर, रितेश बोराडे, नमन महावार, प्रशांत गोरे व प्रशिक्षक राहूल ससाणे तसेच योगेश पवार, निशांत करंदीकर, शुभम गिरी यांचा सत्कार करण्यात आला.