बंद

    01.03.2021 : ‘भारतीय शास्त्रीय नृत्यांचे भवितव्य उज्ज्वल’: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    प्रकाशित तारीख: March 1, 2021

    ‘भारतीय शास्त्रीय नृत्यांचे भवितव्य उज्ज्वल’: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    भारतीय शास्त्रीय नृत्यकला ही शास्त्र शुद्ध गंधर्व विद्या असून नव्या पिढीमध्ये नृत्यकलांबद्दल विशेष आस्था दिसून येत आहे. आज संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या योग, संगीत व कलेच्या सांस्कृतिक ठेव्याकडे गेले आहे. अश्यावेळी, नृत्यकलांचा प्रचार व प्रसार झाला व त्यात संशोधन झाले तर सर्व भारतीय शास्त्रीय नृत्यांचे भवितव्य अतिशय उज्ज्वल राहील, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

    श्री श्री सेंटर फॉर अडव्हांस्ड रिसर्च इन कथक, श्री श्री विद्यापीठ, कटक व इंदोर येथील नटवरी कथक नृत्य अकादमी यांनी संगीत नाटक अकादमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पहिल्या २ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय कथक परिषदेचे उद्घाटन सोमवारी (दि. १) राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत झाले, त्यावेळी ते बोलत होते.

    मध्य प्रदेशच्या संस्कृती, पर्यटन व अध्यात्म मंत्री उषा ठाकूर, कथक गुरु महामहोपध्याय डॉ पुरू दधीच, श्री श्री विद्यापीठाच्या अध्यक्षा रजिता कुलकर्णी, कुलगुरू डॉ अजय कुमार सिंह, रतिकांत मोहपात्रा, विद्या कोल्हटकर, डॉ. मंजिरी देव तसेच कथक क्षेत्रातील संशोधक परिषदेला उपस्थित होते.

    भारतीय कला व संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. मात्र दोनशे वर्षांच्या परकीय राजवटीत पाश्चात्य संस्कृतीच्या उदात्तीकरणामुळे आपल्या संस्कृतीबद्दल देशवासीयांच्या मनात हीनतेची भावना निर्माण झाली होती. आज जगाचे लक्ष संगीत, नाट्य, कला, क्रीडा, संस्कृती व योग या विषयातील भारताच्या अथांग सांस्कृतिक ठेव्याकडे गेले आहे. जसजसे या विषयांत संशोधन होईल, तशी यातून नवनवी रत्ने हाती लागतील. श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या कथक परिषदेमुळे कथक, भरत नाट्यम तसेच इतर सर्व शास्त्रीय नृत्यकलांचे पुनरुत्थान होईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.