बंद

    01.02.2021 : नाविन्यतेचा ध्यास घेऊन उद्यमशिलतेला अधिक चालना देण्याची गरज- राज्यपाल

    प्रकाशित तारीख: February 1, 2021

    मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात १,९१,४९५ स्नातकांना पदव्या
    १४० स्नातकांना पी.एचडी आणि एमफिल, तर १६ पदके
    नाविन्यतेचा ध्यास घेऊन उद्यमशिलतेला अधिक चालना देण्याची गरज- राज्यपाल

    मुंबई, दि. ०१ फेब्रुवारी: आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करताना नाविन्यतेचा ध्यास घेऊन उद्यमशिलतेला चालना देण्याची गरज असून कालपरत्वे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणाऱ्या बदलांना अनुसरून शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

    तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असून, नॅनो तंत्रज्ञान मागे पडून कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र पुढे आले आहे. जगासह देशात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या सहाय्याने अनेक समाजोपयोगी संशोधन होत आहेत, याचा उत्तमोत्तम फायदा देशाला अग्रेसर होण्यासाठी नक्कीच होणार असल्याचेही आशावाद त्यांनी व्यक्त केला.
    मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ आज ऑनलाईन माध्यमातून संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. दीक्षान्त समारंभाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांच्यासह संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. विनोद पाटील, कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, विविध प्राधिकरणांचे मान्यवर सदस्य, प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेत्तर अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

    उपस्थितांशी संवाद साधतांना राज्यपाल म्हणाले की, देशातील एक अग्रगण्य विद्यापीठ म्हणून मुंबई विद्यापीठ ओळखले जाते. मुंबई विद्यापीठाच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले आहे. विद्यापीठाने देशाला पाच भारतरत्न तसेच अनेक पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्ती दिल्या आहेत. समृद्ध राष्ट्राच्या उभारणीत या माजी विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे.
    कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटकालीन परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत मुंबई विद्यापीठाने केलेल्या श्रमिक आणि गरजू लोकांसाठी केलेल्या कार्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे कौतुक केले. कोरोनाच्या काळात अध्ययन- अध्यापनात खंड पडू नये यासाठी मुंबई विद्यापीठाने अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केले आहेत, हे उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

    पदवी प्राप्त करणे ही केवळ शिक्षणाची सुरुवात आहे, शेवट नाही आहे, असे सांगताना विद्यार्थ्यांनी आपण देशासाठी काय करू शकतो याचा विचार करावा, असे राज्यपालांनी सांगितले. आपण नोकरी मागणारे न होता रोजगाराच्या संधी निर्माण करणारे होऊ शकतो का याचा देखील स्नाताकांनी विचार केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
    गेल्या सत्तर वर्षात आपण बव्हंशी इतरांचे अनुकरण केले. आत्मनिर्भर भारतासाठी मात्र नाविन्यतेसह उद्यमशीलतेला प्राधान्य द्यावे लागेल असे त्यांनी सांगितले.
    याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी दीक्षान्त सोहळ्यामध्ये सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
    मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या विकासात्मक अहवालाचे वाचन करताना कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर म्हणाले की, मुंबई विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेवर प्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण श्री रतन टाटा यांचे नामनिर्देशन हे विद्यापीठासाठी भूषणावह आहे. रॅंकीगमध्ये उत्तरोत्तर सुधारणारी कामगिरी उल्लेखनीय असून नुकतेच विद्यापीठाला रुसामार्फत रुपये ५ कोटीचे अनुदान प्राप्त झाले आहे. कौशल्य विकासाआधारीत अभ्यासक्रमांसाठी लवकरच सेंटर फॉर ई- लर्निंग अँड कम्प्युटेशनल फॅसिलिटी स्थापन केले जाणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी (आधीचे अर्थशास्त्र विभाग) विभागात अर्थशास्त्रातील संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तथा युटीआयचे माजी अध्यक्ष डॉ. एस. ए. दवे यांनी रुपये ५ कोटीची देणगी दिली आहे.
    ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र’ शैक्षणिक वर्ष (२०२०-२०२१) पासून सुरु करण्यात आले आहे. नुकताच या केंद्राचा भूमीपूजन सोहळा करण्यात आला आहे. आध्यात्मिक गुरू, थोर समाज सुधारक, तत्वज्ञानी आणि केरळमधील शिक्षण तज्ज्ञ श्री नारायण गुरू यांच्या विचारांवर आणि तत्वज्ञानावर अभ्यास व्हावा यादृष्टिने मुंबई विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभाग आणि कॉन्फडरेशन ऑफ श्री नारायण गुरू ऑर्गेनायझेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये रुपये १ कोटीचा धनादेश कॉन्फडरेशनच्या माध्यमातून विद्यापीठास सुपूर्द करण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले. कोरोनाच्या काळात अध्ययन- अध्यापनात खंड पडू नये यासाठी मुंबई विद्यापीठाने अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केले आहेत. शिक्षकांना प्रशिक्षित करून मूडल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एलएमएस ई-कंटेट विकसीत करण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. तसेच स्वयम कोर्सेसमध्येही महत्वाचे पाऊल विद्यापीठाने उचलले आहे.

    नजीकच्या काळात सेंटर ऑफ एक्सलेंस ईन मेरिटाईम स्टडीज, स्कूल ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज, लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र, अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र, इंटिग्रेटेड सेंटर फॉर रिसर्च डायग्नोस्टिक अँड क्युअर ऑफ कोव्हिड अँड अदर डिसिजेस अशी केंद्र लवकरच स्थापन केली जाणार आहेत. त्याचबरोबर नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांतर्गत एक्वाकल्चर आणि एक्वापोनिक्स हे दोन नविन प्रमाणपत्र अभ्यासक्रम, रत्नागिरी उपकेंद्रात पीजी डिप्लोमा इन इंडस्ट्रीअल सेफ्टी अँड मॅनेजमेंट, माहिती तंत्रज्ञान विभागात पीजी डिप्लोमा इन ब्लॉकचॅन डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट, फेरोसिमेंट आर्किटेक्चरमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, एमएस्सी इन मटेरिअल सायन्स, सेंटर फॉर एक्सलेंस इन मेरिटाईन स्टडीजमध्ये पीजी डिप्लोमा आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम, आंतरविद्याशाखीय संशोधनाला चालना देण्यासाठी अधिक भर दिला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
    आज पार पडलेल्या दीक्षान्त समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण १,९१,४९५ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. या पदवीदान समारंभामध्ये ९८ हजार २६१ विद्यार्थीनी तर ९३ हजार २३४ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.

    विद्याशाखानिहाय आकडेवारी लक्षात घेता यावर्षीच्या दीक्षान्त समारंभामध्ये मानव्यविज्ञान शाखेसाठी २०००१, आंतरविद्याशाखेसाठी ८७६३, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेसाठी १११२४४ आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी ५१४८७ पदव्यांचा समावेश आहे.

    विविध विद्याशाशाखेतील १४० स्नातकांना विद्यावाचस्पती ( पी.एचडी) आणि एमफिल पदव्या प्रदान करण्यात आल्या. विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या १६ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदके बहाल करण्यात आली.

    *****