बंद

    01.01.2026: राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या सहज संवादाने जिंकली पिंपरखेडकरांची मने

    प्रकाशित तारीख : January 2, 2026
    Governor attends the programme organised under the Chhatrapati Shivaji Maharaj Mahaswa Abhiyan at Pimparkhed

    राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या सहज संवादाने जिंकली पिंपरखेडकरांची मने
    गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त स्वागताने राजपाल महोदय भारावले

    नाशिक, दि. १ (जिमाका वृत्तसेवा) : जेमतेम दोन हजार लोकसंख्या असलेल्या दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड गावी आज वेगळीच लगबग होती. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल आणि उत्सुकता होती आणि त्याचबरोबर येणाऱ्या पाहुण्याच्या स्वागतासाठी ओसंडणारा आनंदही चेहऱ्यावर दिसत होता. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सायंकाळी या गावात प्रवेश केला आणि अवघे गाव आनंदले. बैलगाडीतून काढलेली मिरवणूक. त्यासमोर पारंपरिक आदिवासी नृत्याने भारावलेले वातावरण, लहान मुलांचे लेझीम नृत्य, टाळ, मृदुंगाचा ध्वनी आणि गावकऱ्यांच्या उत्साह पाहून राज्यपाल महोदयही भारावले.

    निमित्त होते राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या पिंपरखेड गावच्या भेटीचे. राज्यपाल महोदय दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत. त्यात पिंपरखेड गावी ते मुक्काम करून गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यानंतर अशाप्रकारे राज्यातील कोणत्याही गावी भेटीची आणि मुक्कामाची ही पहिलीच वेळ असल्याचे राज्यपाल श्री. देवव्रत यांनी आपल्या संवादात सांगितले. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी काश्मिरा संख्ये, कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे, सरपंच सोनाली मोरे, उपसरपंच वसंत घडवजे आदी उपस्थित होते.

    राज्यपाल महोदयांनी नागरिकांशी अतिशय जिव्हाळ्याने आणि मनमोकळा संवाद साधला. ते म्हणाले, हा माझ्या जीवनातील महत्वाचा क्षण आहे. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रदेश आहे. ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी आहे. अशा राज्यातील गावाला भेट देण्याचा खुप आनंद आणि समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

    राज्यपाल श्री. देवव्रत म्हणाले, मी एक शेतकरी आहे. नैसर्गिक शेतीसाठी मी आग्रह धरतो. स्वतः शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात किती समस्या आहेत, याची मला जाणीव आहे. त्यामुळे राजभवन अर्थात लोकभवनमध्ये मी खूप कमी राहतो. लोकमध्ये राहायला मला आवडतं, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

    रासायनिक खतांमुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळेच नैसर्गिक शेतीचा मी आग्रह धरतो. माझ्या शेतात ८ प्रजातींच्या ४५० गायी आहेत. त्यातील ६ प्रजाती भारतीय आहेत, असेही ते म्हणाले. राज्यपाल महोदयांनी गावात मुक्काम करणार असल्याचे सांगताच गावकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

    राज्यपाल महोदयांच्या साधेपणा आणि थेट संवाद साधण्याच्या शैलीने गावकऱ्यांची मने मात्र जिंकून घेतली.

    महाराजस्व अभियानात लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि साहित्याचे वाटप

    पिंपरखेड येथे आज महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात आले. यावेळी याठिकाणी विविध विभागांचे एकूण २३ स्टॉल्स मांडण्यात आले होते. त्यातून ६५२ जणांना लाभ देण्यात आला. महसूल, जिल्हा परिषदेसह कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, उमेद, आदिवासी प्रकल्प विभाग आदी विभागांचा यात समावेश होता. राज्यपाल महोदयांनी यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र आणि साहित्याचे वितरण केले.

    घरकुल, दिव्यांग प्रमाणपत्र यासह बहुविभागीय योजनांचा लाभ यावेळी लाभार्थ्यांना देण्यात आला. तसेच सीमा सुरक्षा दलामध्ये निवड झाल्याबद्दल नवनाथ गांगुर्डे यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कारही राज्यपाल महोदयांनी केला. दत्तात्रय वाणी यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिंडोरी तालुक्यातील शहीद झालेल्या जवानांच्या आई वडिलांचाही सन्मान करण्यात आला.

    यावेळी आदिवासी संघटना तसेच पिंपरखेड गावकऱ्यांच्यावतीने सरपंच आणि उपसरपंच यांनी राज्यपाल महोदय यांचा सत्कार केला.