बंद

    01.01.2026: नैसर्गिक शेती काळाची गरज -राज्यपाल आचार्य देवव्रत

    प्रकाशित तारीख : January 2, 2026
    Governor attends a Natural Farming Dialogue organized at Sahyadri Farm in Mohadi

    नैसर्गिक शेती काळाची गरज -राज्यपाल आचार्य देवव्रत
    सह्याद्री फार्म येथे शेतकरी, कृषी सखींसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी साधला संवाद

    नाशिक, दि. १ (जिमाका वृत्तसेवा) : रासायनिक खते, कीटकनाशकांच्या अती वापराने देशातील सुपीक जमीन नापीक केली आहे. नापीक जमीन सुपीक बनवून आत्मनिर्भर भारत करण्यासाठी नैसर्गिक शेती काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

    दिंडोरी तालुक्यात मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे आयोजित नैसर्गिक शेती संवादात ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, सह्याद्री फार्मचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे उपस्थित होते.

    राज्यपाल म्हणून नव्हे, तर शेतकरी म्हणून संवाद साधण्यासाठी आल्याचे नमूद करून राज्यपाल श्री. देवव्रत म्हणाले, हरित क्रांती ही आपली गरज होती. तेव्हा जमीन सुपीक होती. त्यामुळे हेक्टरी १३ किलो युरिया वापराची सूचना कृषी शास्त्रज्ञांनी केली होती. आज हे प्रमाण अनेक पटींनी वाढले आहे. त्याचे विपरीत परिणाम आता दिसून येत आहेत. सुपीक जमिनीतील सूक्ष्म जीव मृतप्राय झाले आहेत. याबरोबरच जगाला तापमान वाढीची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे काही भागात तीव्र उन्हाळा, तर काही भागात अतिवृष्टी होत असल्याचे दिसून येत आहे.

    खते, कीटकनाशकांचे अंश अन्नधान्यात आढळून येत आहेत. या अन्नधान्यामुळे मानवी प्रतिकार क्षमता कमी होऊन दुर्धर आजाराचे रुग्ण वाढत आहेत. ही बाब चिंताजनक आहे. जमिनीची जलसंधारणाची क्षमताही कमी झाली आहे. हे सर्व टाळायचे असेल, तर आपल्याला नैसर्गिक शेतीशिवाय पर्याय नाही. त्याबरोबरच गो पालनाला चालना दिली पाहिजे, असेही राज्यपाल श्री. देवव्रत यांनी सांगितले. नैसर्गिक शेतीचा कृषी विभागाने प्रचार आणि प्रसार करावा. तसेच सह्याद्री फार्मने परिसरातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीला प्रोत्साहित करावे, असेही आवाहन राज्यपाल श्री. देवव्रत यांनी केले.

    विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले, राज्यात नाशिक जिल्हा कृषी क्षेत्रात आघाडीवर आहे. जिल्ह्यात १० लाख हेक्टर क्षेत्रात विविध पिके घेतली जातात. येथील कांदा, द्राक्ष आणि वाइनला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. जिल्ह्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच राज्यपाल श्री. देवव्रत यांच्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रेरणा मिळून शेतकरी प्रगती साधतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    प्रारंभी मंगेश बासकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमानंतर राज्यपाल श्री. देवव्रत यांनी शेतकऱ्यांच्या स्टॉलला भेट देत त्यांच्याशी संवाद साधला.

    यावेळी उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.