बंद

    २६.०१.२०२० प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे राज्यपालांचे भाषण

    प्रकाशित तारीख: January 26, 2020

    महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी, भारताच्या 70 व्या प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी शनिवार दिनांक 26 जानेवारी, 2020 रोजी, सकाळी 9 वाजता, शिवाजी पार्क, मुंबई येथे भाषण :

    बंधू आणि भगिनींनो,

    1. देशाच्या सत्तराव्या प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राच्या जनतेला मी मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो.
    2. माझा मराठाची बोलू कौतुके l परी अमृतातेही पैजा जिंके l असा मराठीचा गौरव करणार्यार संत ज्ञानेश्वर माऊलीला वंदन करून मराठीतून बोलतो.
    छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान समाजसुधारक यांना प्रारंभी अभिवादन करतो.
    3. आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामाला गती देण्यास महाराष्ट्र शासन बांधील आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले हा आपला समृद्ध वारसा आहे. गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. रायगड किल्ल्याच्या विकास आराखडयानुसार विकासकामांना गती देण्यास आम्ही बांधील आहोत.
    4. बंधु आणि भगिनींनो, इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाला शासन गती देत असून प्रस्तावित स्मारकाच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. हे आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला अन्याय तसेच विषमतेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल.
    5. आपल्या थोर समाजसुधारकांनी घालून दिलेल्या मार्गाचे अनुसरण करीत समाजातील वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, याचा मी पुनरुच्चार करतो.
    6. शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. पाया मजबूत असेल तरच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. शेतकरी सक्षम झाला तरच हे शक्य आहे. सध्या अडचणीत असलेल्या बळीराजाला कर्जमुक्त करण्याबरोबरच चिंतामुक्त करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. याकरिता ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ आम्ही लागू केली आहे. एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च, दोन हजार एकोणीस या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदती पीक कर्जाची पुनर्रचना या योजनेत करण्यात येत आहे. ही योजना कालबद्धरीतीने आम्ही राबविणार आहोत. पीक कर्जाची थकीत रक्कम दोन लाख रुपयांहून अधिक असलेल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही नवीन योजना जाहीर करणार आहोत. त्याशिवाय, पीक कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी नवीन योजना सुरु करणे आमच्या विचारात आहे. राज्यात पीक विमा योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासंदर्भात शासनाने मंत्रीमंडळ उपसमिती गठीत केली आहे.
    7. संत गाडगे बाबांची शिकवण होती ‘भुकेल्यांना अन्न l तहानलेल्यांना पाणी l बेकारांना रोजगार l दुःखी व निराशांना हिम्मत ll
    आजपासून शिवभोजन योजनेला प्रारंभ होत आहे हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. गरीब आणि गरजू व्यक्तीला केवळ दहा रुपयांमध्ये आहार देण्याला आज सुरुवात होईल. जिल्हा मुख्यालयाची ठिकाणे व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ही योजना सुरु होत असून टप्प्याटप्प्याने ही योजना राज्यात राबविण्यात येईल. गरजू व्यक्तींना किफायतशीर दरात जेवण मिळण्याचा हा अभिनव उपक्रम यशस्वी होईल, याची मला खात्री आहे.
    8. महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य असून या पुढील काळात उद्योगांना येणाऱ्या अडचणींचे फास्ट ट्रॅकवर निराकरण करण्याला प्राधान्य असेल. राज्यात वैविध्यपूर्ण औद्योगिक विकास करण्यात येईल. शेती, शिक्षण, रोजगार या क्षेत्रामध्ये उद्योजकांच्या योगदानाने अमूलाग्र बदल घडविण्याचा शासनाचा मानस आहे.
    9. मराठीत एक सुविचार ऐकला. ‘केल्याने देशाटन, मनुजा चातुर्य येतसे फार’. राज्यातील वन पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विकास महामंडळ आणि वन विकास महामंडळ यांची एक संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे. वन पर्यटनाचा विकास करून रोजगारामध्ये वाढ करण्यात येईल.
    10. संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे : वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे l पक्षी ही सुस्वरे आळविती l राज्यातील वनीकरण कार्यक्रम, वन्यजीव संवर्धन आणि निसर्ग पर्यटन यामध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. राज्यातील वृक्षाच्छादन वाढविणे, कांदळवन आणि वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्यावर राज्य शासन भर देत आहे.
    11. राज्यात महिलांद्वारे चालवण्यात येणारे आठ लाखांहून अधिक स्वयंसहायता (बचत) गट आहेत. त्यांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करण्याचे आम्ही ठरविले आहे. कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे स्वयंसहायता गटांचे बळकटीकरण करण्याबरोबरच विधवा, विशेषत: शहीद वीरपत्नी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा, परित्यक्ता व घटस्फोटित महिला यांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. माझी खात्री आहे की, समाजातल्या विविध वंचित घटकांसाठी असे कार्यक्रम राबविल्यामुळे या घटकातील व्यक्तीं आर्थिकदृष्टया सबल होण्यास मदत होईल.
    12. माहिती तंत्रज्ञानामुळे आपले जीवन सुलभ झाले आहे. या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करुन प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, गतिमान तसेच पारदर्शी होण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.
    13. अपराध सिध्दतेत वाढ व्हावी यासाठी राज्य शासनाने अनेक निर्णय घेतले आहेत. यामुळे पूर्वीच्या तुलनेत गुन्हेगारांना शिक्षा होण्यात वाढ झाली आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमुळे (फोरेन्सिक लॅब) गुन्हे शोधण्यास मदत होणार आहे. त्यामुळे न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा मोठया संख्येने उभारण्यात येणार आहेत.
    14. महाराष्ट्राच्या निर्मितीचे हे साठावे वर्ष आहे. गेल्या साठ वर्षात कृषी, उद्योग, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, संगीत, शिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये राज्याने उल्लेखनीय प्रगती केली आहे. मराठी रंगभूमीचा इतिहास गौरवशाली असून वर्तमान आणि भविष्यही उज्ज्वल आहे. या चळवळीला एकशेपंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त मुंबई येथे रंगभूमी चळवळीचा इतिहास साकारणारे संग्रहालय सुरु करण्यात येईल. या संग्रहालयामुळे जगातील अशा रंगभूमी चळवळीचे एकत्रित दर्शन जगाला पाहायला मिळेल.
    15. देशातील समुद्रावरील सर्वात जास्त लांबी असणारा पूल राज्यात उभारला जात आहे. शिवडी-न्हावा-शेवा प्रकल्पाच्या म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या पुलाच्या पहिल्या गाळा उभारणीचे काम सुरु झाले आहे. आपण नुकताच या कामाचा शुभारंभ केला. मुंबई – नवी मुंबईला जोडणारा हा भारतातील महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे या भागातील सार्वजनिक वाहतूक गतीने होण्यास मदत होणार आहे.
    16. मुंबईच्या इतिहासातील सर्वात महत्वाकांक्षी असणाऱ्या ‘नरिमन पॉईंट ते वरळी कोस्टल रोड’ प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले आहे. मुंबई शहर आणि पश्चिम उपनगराला जोडणारा कोस्टल रोड प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
    17. नुकतेच ‘राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले होते. रस्ते अपघात कमी करण्यासाठी ‘राज्य रस्ता सुरक्षा अभियान’ राज्यभरात राबविण्यात येत आहे. वाहतूक शिस्तपालनासाठी ‘फिरते तपासणी पथक’ नियुक्त करण्यात आले आहे.
    18. शहरांच्या विकासाबरोबरच शहराचे पर्यावरण संरक्षण देखील महत्त्वाचे आहे. विकासाच्या नियोजनात पर्यावरणपूरक बाबींवर भर देण्यात येईल. एकदाच वापरले जाणारे प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वस्तू यावर बंदी घातली असून या बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत आहे.
    19. कचऱ्याचे संकलन, वाहतूक, ओल्या व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया यासाठी सुविधा निर्माण करण्यात येत आहे. साठलेल्या जुन्या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी तेरा शहरांमध्ये पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाले आहेत. राज्यातील कचरामुक्तीसाठी राज्यस्तरीय एकत्रित आराखडा तयार करण्याच्या तसेच राज्यातील सर्वच शहरांमध्ये अमृत वन प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
    20. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या दिव्यांग प्रकारानुसार आवश्यक असणारी विशेष प्रकारची पुस्तके आणि साहित्य उपलब्ध करुन दिले आहेत. याचा फायदा राज्यातील अडीच लाखांहून दिव्यांग विद्यार्थ्यांना झाला आहे. दिव्यांगाच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच विशेष कौशल्याचा राज्याला उपयोग होईल, याची मला खात्री आहे. दिव्यांगांसाठी सार्वजनिक ठिकाणी दिव्यांग – स्नेही सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहील.
    21. नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर विभागातील आदिवासी क्षेत्रात टप्प्याटप्प्याने क्रीडा उत्कृष्टता केंद्र अथवा क्रीडा अकादमी निर्माण करण्यात येईल. यामुळे आदिवासी युवकांचे खेळामधील कौशल्य अधिक वाढेल.
    22. वैद्यकीय उपचार महाग होत असताना सर्वसामान्यांना माफक दरात वैद्यकीय सेवा, उपचार उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. सर्वसामान्यांना परवडणारी वैद्यकीय सेवा देणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
    23. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मंत्रालयासह नागपूर येथेही सुरु करण्यात आला आहे. आपल्या समस्या सोडविण्यासाठी ग्रामीण भागातून मुंबईत येणाऱ्या सामान्य नागरिकांचा वेळ, कष्ट आणि पैसे वाचावे आणि यासाठी राज्यातील सर्व विभागीय कार्यालयांत मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरु करण्यात आला आहे.
    24. बहु असोत सुंदर संपन्न की महा l प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा l महाराष्ट्र एकसंघ आहे आणि एकसंघ राहील. देशाच्या राज्य घटनेप्रती आपणा सर्वांचे उत्तरदायित्व आहे, हे मी अधोरेखित करु इच्छितो. आजच्या या प्रजासत्ताक दिनी संविधानाने घालून दिलेले आदर्श व मूल्ये यांच्याप्रती असलेली आपली बांधिलकी अधिक दृढ करुया आणि एक बलशाली, प्रगतीशील व सर्वसमावेशक अशा नवीन महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी कटिबध्द होऊ या.

    जय हिंद ! जय महाराष्ट्र !