१२ प्रगतीशील शेतकऱ्यांना राज्यपालांनी केले लॅपटॉपचे वाटप
आश्वासन पूर्ती
१२ प्रगतीशील शेतकऱ्यांना राज्यपालांनी केले लॅपटॉपचे वाटप
जल व्यवस्थापन, फलोत्पादन, अन्नप्रक्रिया, पशु संवर्धन यांसह विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेल्या १२ शेतकऱ्यांना आज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी राजभवन येथे लॅपटॉप भेट दिले.
जून महिन्यात दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान सोहोळ्यात सन्मानित केलेल्या या शेतकऱ्यांना आपल्या तर्फे लॅपटॉप देण्याचे राज्यपालांनी आश्वासन दिले होते, त्यानुसार आज लॅपटॉप वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला राज्यपालांच्या पत्नी विनोदा, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग व इतर मान्यवर उपस्थित होते.
कृषी ही भारताची संस्कृती असून शेतकऱ्यांनी कठीण परिस्थितीचा सामना करीत देशाला अन्न धान्यामध्ये स्वयंपूर्ण केले. मात्र आज शेतजमीन अनेक तुकड्यांमध्ये वाटली जाऊन शेतकऱ्यांकडील सरासरी जमीन अतिशय घटली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण गोष्टींचा अंगीकार केल्यास शेतकरी संपन्न होईल, असे राज्यपालांनी सांगितले.
राज्यात पाण्याचे संकट गंभीर रूप धारण करत असून अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या दृष्टीने पाण्याचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज झाली असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
आजचा शेतकरी शिक्षित आहे. त्याला तंत्रज्ञानाची आवड आहे. त्यामुळे कृषी संशोधन व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे. गटशेती केल्यास शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असे मत कृषी सचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केले.
राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी प्रास्ताविक केले. शेतकऱ्यांच्या वतीने ब्रम्हदेव सरडे, ता. करमाळा, जि. सोलापूर यांनी मनोगत व्यक्त केले.
संजय ज्ञानोबा शिंदे, नेकनूर, जि. बीड (जल व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य),ब्रम्हदेव नवनाथ सरडे, सोगाव, जि. सोलापूर (कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधन कार्य), दत्तात्रय गणपतराव गुंडावार, भद्रावती, जि. चंद्रपूर (कृषी क्षेत्रातील अभिनव उपक्रमात उल्लेखनीय कार्य), ईश्वरदास धोंडीबा घनघाव, डोंगरगाव, जि. जालना (ग्रामीण कृषी प्रक्रिया उदयोगातील उल्लेखनीय कार्य), बाळासाहेब गीते, जि. उस्मानाबाद (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), अशोक राजाराम गायकर, जिल्हा रायगड, (मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), शरद संपतराव शिंदे, जि. नाशिक (फळे, फुलशेती व भाजीपाला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), लक्ष्मण जनार्दन रासकर, जि. नाशिक (फळे, फुलशेती व भाजीपाला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), सौ.विद्या प्रल्हाद गुंजकर, जि. बुलढाणा (कृषी व सामाजिक वनीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), सुधाकर मोतीराम राऊत, जि बुलढाणा (कृषीपूरक उदयोग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), ताराचंद चंद्रभान गागरे (माजी सैनिक) जि. अहमदनगर (कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य), श्रीकृष्ण सोनुने जि. अहमदनगर (कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारी संस्था) अशी पुरस्कारार्थी शेतकऱ्यांची नावे आहेत.