सेवाभावी वृत्ती व त्याचा गौरव करणे हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक – उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू
जमनालाल बजाज फाऊंडेशन पुरस्कार सेवाभावी वृत्ती व त्याचा गौरव करणे हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक
– उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू
मुंबई, दि. 15 : सेवाभावी वृत्ती व त्याचा गौरव करणे हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. जमनालाल बजाज फाऊंडेशनच्यावतीने अशा सेवाभावी व्यक्तींचा सन्मान केला जातो. ही बाब महत्वपूर्ण असून या समारंभास उपस्थित राहिल्याबद्दल मला आनंद वाटत आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी आज येथे केले.
जमनालाल बजाज फाऊंडेशनच्यावतीने हॉटेल ताजमहल येथे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून राज्यपाल चे.विद्यासागर राव, प्रमुख पाहुणे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे तसेच विश्वस्त मंडळ अध्यक्ष राहुल बजाज, धीरुभाई एस.मेहता, मधुर बजाज, फाऊंडेशनचे सल्लागार मंडळ न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, श्रीमती अनु आगा, डॉ.अनिल काकोडकर, डॉ. फिरोज गोदरेज, श्रीमती मिनल बजाज तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
उपराष्ट्रपती श्री.नायडू म्हणाले, बजाज परिवाराकडून सेवेचा वारसा पुढील पिढीने घेतला आहे. हे प्रशंसनीय आहे. या पुढील पिढीने देखील हा वारसा हक्क घ्यावा. एकूणच आपल्या देशात वसुधैव कुटुंबकम् ही संस्कृती असून त्याचे जतन आपण करीत आहोत. संस्कृती म्हणजे जीवनपद्धती याचे सविस्तर विवेचन करताना श्री. नायडू यांनी सांगितले, आपल्याजवळील अन्न भूक लागली म्हणून आपण खाणे ही आपली प्रवृत्ती, दुसऱ्याकडील अन्न ओढून खाणे ही विकृती तर आपले अन्न दुसऱ्यास देणे ही संस्कृती होय. प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी ओळखून समाजाप्रती कार्य करणे आवश्यक आहे.
आई-वडील, जन्मभूमी, मातृभूमी, कर्मभूमी आणि गुरुवर्य यांना कधीही विसरु नका. त्यांचा कधीही अनादर करु नका. विविधतेने नटलेला आपला देश हा इतरांसाठी गुरु आहे. पुरातन काळात आपल्याकडील विद्यापीठांत शिकण्यासाठी जगातील लोक येत. हीच आपली सांस्कृतिक परंपरा टिकविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांप्रती आदर, विविधतेतील एकता, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाव, बेटी पढाओ अभियान अशा विविध बाबींना स्पर्श करत त्यांनी आपले विचार मांडले.
पुरस्कार्थींचा गौरव करताना ते म्हणाले, अशा प्रकारच्या पुरस्कार सोहळ्यातून पुरस्कार्थींच्या कार्याची ओळख समाजाला होऊन त्यातून उत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळते किंबहुना अशाच प्रकारचा उद्देश पुरस्कार सोहळ्याचा असतो. हे पुरस्कार्थी समाजातील तळगाळापर्यंतच्या लोकांमध्ये काम करणारे आहेत. त्यामुळे योग्य अशा व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल त्यांनी पुरस्कार निवड मंडळाचे व फाऊंडेशनचे आभार मानले. मराठी, इंग्रजी व हिंदी या तिन्ही भाषेत बोलून उपस्थितांची त्यांनी मने जिंकले.
पुरस्काराचे मानकरी
40 व्या जमनालाल बजाज पुरस्काराचे स्वरुप सन्मानपत्र, गौरव चिन्ह आणि 10 लाख रुपये प्रत्येक विभागासाठी असे असून याचे मानकरी – रचनात्मक कार्यात अव्दितीय कामगिरीचा पुरस्कार उत्तराखंडचे धुम सिंह नेगी. ग्रामीण विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार गुजरातच्या श्रीमती रुपल देसाई व राजेंद्र देसाई. महिला आणि मुलांच्या विकासासाठीचा पुरस्कार राजस्थानच्या श्रीमती प्रसन्न भंडारी आणि परदेशात गांधीजींच्या तत्वांच्या प्रसारासाठीचा पुरस्कार युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे डॉ.क्लेबोर्न कार्सन यांना प्रदान करण्यात आला.
पुरस्कार्थींनी सत्कारास उत्तर देताना पुरस्काराबद्दल स्वत:ला गौरवशाली समजतो असे सांगून आभार व्यक्त केले. तसेच पुरस्काराने आपली जबाबदारी आणखी वाढल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी राहुल बजाज यांनी प्रास्ताविकातून बजाज फाऊंडेशनची सविस्तर माहिती दिली. न्या. धर्माधिकारी यांनी पुरस्काराची पार्श्वभूमी सविस्तर विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मिनल बजाज यांनी केले तर मधुर बजाज यांनी आभार प्रदर्शन केले. या समारंभास विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.