विविध देशांमधील भारताच्या उच्चायुक्त व राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
महाराष्ट्राच्या आर्थिक बलस्थानांची माहिती करून घेण्यासाठी भेटीचे आयोजन
विविध देशांमधील भारताच्या उच्चायुक्त व राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
भारताच्या विविध देशात नियुक्तीवर असलेल्या उच्चायुक्त तसेच राजदूतांच्या एका शिष्टमंडळाने बुधवारी (दि. २७) राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली. महाराष्ट्राचे आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक हित विविध देशांमध्ये वृद्धिंगत करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयातर्फे या भेटीचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यात पायाभूत सुविधा, उद्योग, शिक्षण, पर्यटन व संस्कृती या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यास मोठ्या संधी उपलब्ध असल्याची माहिती राजदूतांनी तसेच उच्चायुक्तांनी संबंधित देशांना करून द्यावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
भारताचे सौदी अरेबियातील राजदूत आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अहमद जावेद, भारताचे रशियातील राजदूत पंकज सरण, ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्चायुक्तडॉ. अजय गोंडाणे, डेन्मार्क येथील भारताचे राजदूत अजित विनायक गुप्ते, ट्युनिशियातील भारताचे राजदूत प्रशांत पिसे, फिजीतील भारताचे उच्चायुक्त विश्वास विदू सपकाळ, उत्तर कोरियातील भारताचे राजदूत अतुल गोतसुर्वे, बेलारूस येथील राजदूत संगीता बहादूर आणि तुर्कमेनिस्तान येथील राजदूत अझर खान हे यावेळी उपस्थित होते. राजशिष्टाचार प्रमुख आणि प्रधान सचिव नंदकुमार हे देखील बैठकीला उपस्थित होते.
सौदी अरेबियात भारतीय शिक्षकांची मोठी मागणी
सौदी अरेबियातील विद्यापीठांमध्ये अनेक भारतीय शिक्षक अध्यापन करीत असून तेथे भारतीय शिक्षकांची तसेच डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे अहमद जावेद यांनी सांगितले. सौदी अरेबियात अनेक चित्रपटगृह सुरु होत असून भारतातील मनोरंजन उद्योग, चित्रपट निर्मिती उद्योग तसेच पर्यटनाला बराच वाव असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय पदार्थांना सर्वत्र मागणी
भारतीय अन्न पदार्थांना जगभर मागणी असून डेन्मार्क येथे उच्च अभिरुचीच्या भारतीय रेस्टारेंटसची मोठी मागणी असल्याचे डेन्मार्क येथील भारताचे राजदूत अजित गुप्ते यांनी सांगितले. डेन्मार्क दुग्ध उत्पादने, उच्च दर्जाची प्राणी उत्पादने, अक्षय उर्जा व जल व्यवस्थापन या क्षेत्रांमधे अग्रेसर असून महाराष्ट्राला डेन्मार्कसोबत सहकार्य निश्चितच उपयुक्त ठरेल असे त्यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियाकडे सुपरअन्युइटी फंड मोठ्याप्रमाणावर असून महाराष्ट्राने हा निधी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीसाठी मिळविण्याचे दृष्टीने प्रयत्न करावे अशी सूचना ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्चायुक्त डॉ. अजय गोंडाणे यांनी केली.