इतिहासाचा साक्षीदार असलेले नागपूर येथील लोकभवन

महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या राज्यातील निवासस्थानांपैकी एक असलेल्या नागपूर येथील लोकभवनाला आपला स्वतंत्र असा 125 वर्षांचा इतिहास आहे. भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने नागपूर येथील लोकभवन राज्यातील मुंबई व पुणे येथील लोकभवनांच्या तुलनेत सर्वात मोठे आहे.
सन १८९१ साली नागपूर येथे, आज लोकभवन म्हणून ओळखली जाणारी भव्य वास्तू मध्य प्रांताच्या कमिशनरचे निवासस्थान म्हणून बांधली गेली.
मध्य प्रांतांचे (सेंट्रल प्रोविंसेस) कमिशनर ए पी मॅकडोनेल लोकभवनाच्या वास्तूमधले पहिले निवासी होते.
उंच टेकडीवर वसलेले असल्याने नागपूर लोकभवनाच्या या वास्तूतून अर्धे-अधिक शहर व सभोवतालचा परिसर दिसतो.
गोंडराजे बख्त बुलंद शाह यांनी आपली राजधानी सन १७०२ साली नागपूरला हलविल्यानंतर नागपूरचा खर्या् अर्थाने सुवर्णकाळ सुरू झाला. सन १८०४ साली रघुजीराजे भोसले यांच्या दरबारात पहिले ब्रिटिश रेसिडेंट माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांची नियुक्ती होईपर्यंत म्हणजे साधारणपणे १०२ वर्षे हा काळ राहिला असे म्हणता येईल.
दिनांक २ नोव्हेंबर १८६१ रोजी ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली भारत सरकारने एका ठरावद्वारे सेंट्रल प्रोविंसेस (मध्य प्रांताची) निर्मिती केली. त्यानंतर तीस वर्षांनी लोकभवनाच्या वास्तूची निर्मिती झाली. १९०३ साली वर्हााड अर्थात बेरार हा भाग मध्य प्रांताला जोडण्यात आल्यानंतर प्रदेशाचे नामकरण सी.पी. अँड बेरार असे झाली. त्यामुळे कमिशनरचे निवासस्थान असलेली लोकभवन ची वास्तू आता सी.पी. अँड बेरारच्या कमिशनरचे निवासस्थान झाली. याच सुमारास चीफ कमिशनरच्या कार्यालयाचा उल्लेख ‘गोंडवाणा गबर्नेटोरिस’ असा करण्यात आल्याचे दिसते. सन १९२० पासून ही वास्तू मध्य प्रांताच्या गव्हर्नरचे ‘गव्हर्नमेंट हाऊस’ झाली.
स्वातंत्र्यप्राप्ती नंतर हे निवासस्थान मध्यप्रदेशच्या गव्हर्नरचे निवासस्थान झाले. मंगलदास पक्वासा हे पहिले राज्यपाल तर पंडित रवी शंकर शुक्ल हे मध्यप्रदेशचे पहिले ‘पंतप्रधान’ झाले. सन १९५६ साली नागपूर द्विभाषिक मुंबई राज्याला जोडल्यानंतर नागपूर येथील लोकभवन मुंबई राज्याच्या राज्यपालांचे ‘गव्हर्नमेंट हाऊस’ झाले व सन १९६० साली महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर महाराष्ट्राच्या राज्यपालांचे नागपुरातील निवासस्थान झाले.
कमिशनर हाऊस ते लोकभवन : एका वास्तूचा प्रवास
- १८९१: चीफ कमिशनर, सेंट्रल प्रोविंस यांचे निवासस्थान
- १९०३: चीफ कमिशनर, सेंट्रल प्रोविंस अँड बेरार (सी.पी. अँड बेरार) यांचे निवासस्थान
- १९२०: सेंट्रल प्रोविंसेसचे गव्हर्नर यांचे गव्हर्नमेंट हाऊस
- १९४७: जुन्या मध्यप्रदेशच्या राज्यपालांचे शासकीय निवासस्थान
- १९५६: मुंबई राज्याच्या राज्यपालांचे नागपूर येथील शासकीय निवासस्थान
- १९६०: महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांचे नागपूर येथील शासकीय निवासस्थान
- १९८८: महाराष्ट्राच्या उपराजधानीतील लोकभवन
असे आहे नागपूर येथील लोकभवन :
सुमारे ९४ एकर परिसरात नागपूर येथील लोकभवन वसले असून त्याची प्रवेशद्वारे वेगवेगळ्या भागात उघडतात ! नागपूर येथील लोकभवनात एकाच अखंड वास्तूमध्ये दरबार हॉल व बॅन्क्वेट हॉल आहेत.
लोकभवन च्या इमारतीच्या प्रवेशद्वारावरच ‘Erected 1891, E Penny EX ENG’ असे कोरलेली शिला आहे. भारतीय तसेच पाश्चात्य वास्तूशैलीचा मिलाफ असलेल्या लोकभवन चे बांधकाम करण्यास किमान दोन ते तीन वर्षे लागली असतील, हे जाणवते. ही वास्तु २४० x १५० फूट या आकाराच्या एका चौकोनी चौथर्याषवर बांधली आहे. बांधकामाचे एकूण क्षेत्रफ़ळ ३२३७ चौरस मीटर इतके आहे. या भव्य वास्तूपुढे असलेले वर्तुळाकार गवत (lawn) या वास्तूची शोभा अधिकच वाढविते. या इमारतीमध्ये राज्यपालांचे निवासस्थान तसेच कार्यालय तर आहेच शिवाय सहा गेस्ट रूम्स देखील आहेत. याच्या पुढील भागात कमानी असून संपूर्ण इमारतीच्या दर्शनी भागात लांबच लाब वरांडा आहे. इमारतीच्या खाली पूर्वीच्या परंपरेप्रमाणे तळघर आहे. सन १९१२ साली नागपुरात वीज आली त्यापूर्वी येथील हॉल्समध्ये कापडी पंखे होते. संपूर्ण इमारत कौलारू असून अलाहाबाद पद्धतीची कौले त्यावर बसविण्यात आली आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबई येथील लोकभवनात घोडपागा होता, त्याउलट नागपूर येथील लोकभवनात चक्क हत्तीखाना होता !! नागपूर येथील हत्तीखान्याच्या जागी आज विस्तारित पाकशाला आहे.
येथील विस्तीर्ण लॉंनच्या बाहेर पंचधातूपासून बनविलेली एक मोठी तोप आहे. या तोपेवर फारशी लिपीत कोरले असून ही तोप हिजरी सन १०७४ अर्थात इसवी सन १६६३ साली औरंगजेब यांच्या काळातील आहे. या तोपेच्या काही अंतरावरच एक दुसरी लहान तोप असून तिच्यावर १६५४ असे वर्ष लिहिले आहे. या लहान तोपेच्या जवळच लोकभवनातील ध्वजस्तंभ असून तो नागपुरातील सर्वात उंच असा ध्वजस्तंभ आहे.
जैवविविधता उद्यान:
सन २०११ साली नागपूर येथील लोकभवनाच्या ७० एकर परिसरात एक भव्य जैव विविधता उद्यान तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी ३० हजार विविध प्रजातींची वनसंपदा लावण्यात आली आहे. आज नागपूर लोकभवनात दीड लक्ष झाडे आहेत. विद्यार्थ्यांमध्ये तसेच युवापिढीमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण व्हावी या दृष्टीने हे जैवविविधता उद्यान तयार करण्यात आले असून ते शालेय विद्यार्थ्यांसाठी खुले असते. जीव विविधता उद्यानामुळे हा परिसर अधिकच सुशोभित झाला असून तेथे ‘नक्षत्र वन’, ‘निवडुंग वन’, फुलपाखरू उद्यान, गुलाब उद्यान, औषधी वनस्पती उद्यात अशी विविध उद्याने विकसित करण्यात आली आहेत. एकट्या गुलाब उद्यानात देशभरातील गुलाबाच्या तब्बल २५७ प्रजाती येथे पहायला मिळतात !!
नागपूर लोकभवनात १० किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला असून त्यातून लोकभवन परिसरातील दिवे सौर उर्जेवर प्रकाशित करण्यात आले आहेत.
नागपूर लोकभवनात केंद्रीय भूजल मंडळाच्या माध्यमातून जल व मृद संधारणाचे मोठे काम करण्यात आले असून एकूण ४९ सिमेंट बंधारे, नाला बंधारे तसेच गेबिअन पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आहे. नागपूर येथील राज भवन हे राज्यपालांचे निवासस्थान तर आहेच. परंतु राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान नागपूर भेटीवर असताना त्यांचे देखील निवासस्थान असते. दरवर्षी अधिवेशन काळात राज्यपाल लोकभवन नागपूर येथे विधान मंडळाचे सदस्य तसेच गणमान्य व्यक्तींसाठी चहापानाचे आयोजन करीत असतात. या चहापानाला ‘At Home’ रिसेप्शन असे म्हणण्याची प्रथा आहे.
कोणे एके काळी परकीय राजवटीचे सत्ताकेंद्र असलेले गव्हर्मेंट हाउस आज स्वतंत्र भारताने स्वीकारलेल्या संसदीय लोकशाही पद्धतीतील राज्यातील महत्वपूर्ण संस्था म्हणून आपले घटनात्मक कर्तव्य बजावित आहे. ‘युनियन जॅक’ उतरून राष्ट्रीय ध्वज असलेला तिरंगा डौलाने फडकताना पाहण्याचे भाग्य लोकभवनच्या या वास्तूला लाभले आहे.
(संदर्भ: सदाशिव गोरक्षकर यांचे ‘लोकभवन्स इन महाराष्ट्र’)