बंद

    राज्यपालांच्या हस्ते आंध्र एजुकेशन सोसायटी शाळेतील माजी शिक्षकांचा हृद्य सत्कार

    प्रकाशित तारीख: February 18, 2019

    जॉनी लिव्हर यांची गुरुजनांना ‘सुवर्ण दक्षिणा’

    राज्यपालांच्या हस्ते आंध्र एजुकेशन सोसायटी शाळेतील माजी शिक्षकांचा हृद्य सत्कार

    प्रसिद्ध हास्य अभिनेते जॉनी लिव्हर यांच्या शाळेतील तुकडीला शिकविणाऱ्या वडाळ्यातील आंध्र एज्युकेशन सोसायटी विद्यालयातील माजी शिक्षकांचा राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते, अभिनेत्री तब्बू यांच्या उपस्थितीत, सोमवारी भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

    “अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक गरीब मुलांना आमच्या शिक्षकांनी पुत्रवत प्रेम देऊन त्यांच्या जीवनाचे सोने केले”, अशी भावना जॉनी लिव्हर यांनी यावेळी व्यक्त केली.

    मैसूर असोसिएशन येथे झालेल्या ‘आभार’ या कृतज्ञता सोहळ्यामध्ये जॉनी लिव्हर यांनी स्वतःच्या वतीने हयात असलेल्या प्रत्येक गुरुजनांना तसेच दिवंगत शिक्षकांच्या कुटुंबियांना स्वतःकडून सुवर्ण मुद्रा भेट दिली.

    बहुसंख्य तेलुगु भाषिकांच्या आंध्र एज्युकेशन सोसायटी शाळेतून सन १९७३ साली म्याट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुकडीने या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते.

    ‘मातृभाषेतून होणारे शिक्षण प्रभावी’: राज्यपाल

    आंध्र एज्युकेशन सोसायटी शाळेने केलेल्या शिक्षण कार्याचा राज्यपालांनी आपल्या भाषणात गौरव केला. मातृभाषेतून घेतलेले शिक्षण अधिक प्रभावी असते असे युनेस्कोने आपल्या अहवालात नमूद केल्याचे उद्धृत करून राज्यपालांनी मातृभाषेचे जतन आणि संवर्धन करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

    मराठी, तेलुगु यांसह विविध भारतीय भाषांमधून शिक्षण देणाऱ्या शाळा बंद होत आहेत याबद्दल चिंता व्यक्त करून राज्यपालांनी दिनांक २१ फेब्रुवारी हा ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ पाळण्याचे तसेच या दिवशी मातृभाषेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले.

    यावेळी शाळेच्या माजी प्राचार्या ललिता शर्मा तसेच शिक्षक ए.एन. सिंग, आशा बहुतुळे, अरुणा श्रीकृष्णा, आशा कार्ले, के. जोसेफ व सुब्बलक्ष्मी नारायणन यांचा राज्यपालांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच हयात नसलेले शिक्षक मूर्ती सर, पुन्नय्या सर व शकुंतला टीचर यांच्या कुटुंबियांचा देखील राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    जॉनी लिव्हर यांच्या कन्या जामी लिव्हर यांनी यावेळी सांगितीक कॉमेडी सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.