बंद

    ‘महालक्ष्मी सरस‘ प्रदर्शन उद्घाटन व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण प्रसंगी राज्यपालांचे भाषण.

    प्रकाशित तारीख: January 23, 2019

    ‘महालक्ष्मी सरस‘ प्रदर्शन उद्घाटन व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण प्रसंगी राज्यपाल चे विद्यासागर राव यांचे भाषण. स्थळ: एमएमआरडीए ग्राउंड, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई. वेळ: सकाळी ११०० वाजता बुधवार दिनांक २३ जानेवारी २०१९

    श्रीमती पंकजाताई गोपीनाथ मुंडे, ग्राम विकास व महिला – बालकल्याण मंत्री, श्री असीम गुप्ता, प्रधान सचिव, ग्राम विकास आणि पंचायत राज विभाग, सर्व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार विजेत्या महिला, व्यासपिठावरील इतर मान्यवर, विविध राज्यातून आलेले स्टॉल धारक, बचत गटांचे प्रतिनिधी, माता, भगिनी आणि बंधुंनो,

    नमस्कार. सलग पाचव्या वर्षी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या निमित्ताने आपणांस भेटून खूप आनंद वाटला. सुरुवातीला आपणा सर्वांना नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

    राज्यपाल म्हणून मी अनेक कार्यक्रमांना, जात असतो. परंतु, महालक्ष्मी सरस परिवाराशी माझे प्रेमाचे नाते आहे.

    मी, या ठिकाणी दरवर्षी येतो, याला दोन कारणे आहेत: पहिले कारण म्हणजे मला पंकजाताई दरवर्षी उद्घाटनासाठी बोलावतात.

    दुसरे कारण म्हणजे, मला आपल्याकडून नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात.

    गेल्या पाच वर्षांमध्ये महालक्ष्मी सरस अंतर्गत महिला बचत गटांनी लक्षणीय प्रगती केली आहे.

    मुख्य म्हणजे, महिला बचत गटांची उत्पादने आता वर्षभर मिळू लागली आहेत.

    आज अमेझॉन, फ्लिप कार्ट यांसारखे रिटेलर्स तसेच डीपार्टमेंटल स्टोर्स देखील बचत गटांची उत्पादने ठेवू लागली आहेत. हा तुमचा विजय आहे.

    महिला बचत गटांमुळे राज्यातील महिलांची निश्चितच सामाजिक-आर्थिक प्रगती झाली आहे, यात शंका नाही. या करिता मी राज्य शासनाचे अभिनंदन करतो.

    माझ्या भगिनी आणि बंधुंनो,

    देशाच्या आर्थिक विकासात तीन प्रमुख क्षेत्रांचे योगदान आहे. एक सेवा क्षेत्र, दुसरे उत्पादन क्षेत्र आणि तिसरे कृषी क्षेत्र.

    महिला बचत गटांनी, आता कृषी व ग्रामीण उत्पादनांसोबत इन्शुरन्स, बँकिंग, तसेच इतर सेवा क्षेत्रात देखील यावे. आज सेवा क्षेत्र वेगाने वाढत आहे. त्यामुळे महिलांची आर्थिक प्रगती झपाट्याने होईल.

    माझी शासनाला एक विनंती आहे. शासनाने याच ठिकाणी प्रदर्शनाला जोडून ‘ज्ञान कौशल्य केंद्र’ (Knowledge & Skills Centre) सुरु करावे.

    त्या ठिकाणी महिलांना कौशल्य शिक्षण द्यावे. तसेच, उद्योग, व्यवसाय, व्यवस्थापन, संभाषण कला, आदी प्रशिक्षण द्यावे. शासनाच्या विविध योजनांची देखील माहिती द्यावी.

    प्रधान मंत्री मुद्रा योजने अंतर्गत स्वयं रोजगारासाठी तसेच उद्योगासाठी भांडवल – कर्ज कसे मिळेल, याबाबत देखील मार्गदर्शन करावे.

    महात्मा फुले यांनी, सांगितले होते की, विद्येविना मती नाही, मतीविणा प्रगती नाही आणि प्रगतीविणा वित्त नाही.

    त्यामुळे, माझी सर्व भगिनींना विनंती आहे की ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करून आपली प्रगती साधावी.

    ‘महालक्ष्मी सरस’ हे केवळ विक्री प्रदर्शन नाही. तर महालक्ष्मी सरस, हा, महिला, कारागीर व आदिवासी बंधू – भगिनी यांचे प्रगतीचा ‘समृद्धी महामार्ग‘ आहे.

    आज येथे, राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार प्राप्त केलेल्या सर्व महिला बचत गटांचे मी हार्दिक अभिनंदन करतो, आणि प्रदर्शनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो.

    धन्यवाद

    जय हिंद !! जय महाराष्ट्र !!

    ***