बंद

    महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री. चे.विद्यासागर राव यांचा महाराष्ट्र दिनाचा संदेश.

    प्रकाशित तारीख: May 1, 2017

    सोमवार दिनांक 1 मे, 2017 रोजी शिवाजी पार्क, मुंबई येथे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या प्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री. चे.विद्यासागर राव यांनी द्यावयाचा महाराष्ट्र दिनाचा संदेश.

    बंधू आणि भगिनींनो,

    1. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला मी हार्दीक शुभेच्छा देतो. तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त मी राज्यातील सर्व कामगारांनादेखील शुभेच्छा देतो. यावर्षी जर्मनीच्या म्युनिच आणि स्टुटगार्ट या शहरांत देखील महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येत आहे, हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.

    2. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या हुतात्म्यांना मी भावपूर्ण आदरांजली वाहतो.

    3. आपल्या राज्याचे विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महान द्रष्टे, लोकनेते आणि समाजसुधारक यांचे या प्रसंगी आपण स्मरण करु या.

    4. राज्याच्या अवर्षणप्रवण भागातील पाणी टंचाईची सतत भेडसावणारी समस्या सोडविण्यासाठी, शासनाने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मला आपणास सांगण्यास आनंद होतो की, जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत 2.5 लाखांपेक्षा अधिक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यातून सुमारे 12 लाख हजार घन मीटर इतकी पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यात आली आहे. “मागेल त्याला शेततळे योजना” आणि त्यासारख्या इतर उपक्रमांच्या माध्यमातून शाश्वत शेतीचे स्वप्न साकार होण्याचा एक प्रशस्त मार्ग खुला होईल, याची मला खात्री आहे. मी आपणास सांगू इच्छितो की, ग्रामीण पाणलोट क्षेत्रात जलसंधारणाची कामे करुन त्याद्वारे सुमारे 11 हजार गावे आधीच दुष्काळमुक्त झाली आहेत. 48 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 33 हजार 115 कोटी रुपये इतक्या रकमेचे कर्ज वितरित करण्यात आले आहे आणि 6 लाख 85 हजार इतक्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जांचे पुनर्गठन करण्यात आले आहे.

    5. मला सांगण्यास आनंद होत आहे की, राज्य शासनाने 22 एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रांवर आलेली संपूर्ण तूर खरेदी केली आहे. यासाठी माझ्या शासनाने पुरेसा निधी उपलब्ध करुन दिला होता. विदर्भ व मराठवाडा भागातील 4 हजार गावांना अवर्षणमुक्त करण्याच्या हेतूने, जागतिक बँक सहाय्यित ‘नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प’ साकारण्यात येत आहे.

    6. राज्यातील सामान्य माणूस आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये थेट संवाद साधणारा, ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ नावाचा एक नवीन दूरचित्रवाणी आणि आकाशवाणी कार्यक्रम अलिकडेच सुरु करण्यात आला आहे.

    7. मला आपणास सांगण्यास आनंद होतो की, स्वच्छ भारत या महत्वाकांक्षी अभियानाचा एक भाग म्हणून, राज्यातील 225 शहरे हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत. माझे शासन 2 ऑक्टोबर 2017 पर्यंत महाराष्ट्राच्या नागरी भागाला हागणदारीमुक्त करण्याची बांधिलकी अधिक दृढ करीत आहे.

    8. राज्यातील आदिवासी मुलांमधील कुपोषणाची समस्या दूर करण्याच्या हेतूने, शासनाने ‘भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजने’ची व्याप्ती अधिक व्यापक केली आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना एक वेळचा चौरस आहार दिला जातो.

    9. ‘सर्वांसाठी आरोग्य’ हे उद्दिष्ट गाठण्याकरिता, आम्ही महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्याचे ठरविले आहे. या योजनेअंतर्गत समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शस्त्रक्रियांकरिता व उपचारांकरिता आरेाग्य विम्याचा लाभ देण्यात येईल. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत, केंद्र शासनाने अकोला, यवतमाळ, लातूर व औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अति- विशेषोपचार सेवांसाठी 600 कोटी रूपये मंजूर केले आहेत. दर्जेदार जेनेरिक औषधे रास्त दरांमध्ये देण्याच्या दृष्टीने, राज्यातील कर्मचारी राज्य विमा योजना रूग्णालयांमध्ये ‘जन औषधी केंद्रे’ उभारण्यात येत आहेत.

    10. देशातील सर्वाधिक पसंतीचे गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून महाराष्ट्राने आपले स्थान कायम राखले आहे. ‘महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुविधा कक्ष म्हणजेच मैत्री ही 18 विभागांकडील आवश्यक असणाऱ्या 44 औद्योगिक परवानग्या देणारी, एक खिडकी योजना असून त्याद्वारे 85 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करणे आणि अंदाजे दीड लाख नोकऱ्यांच्या संधी निर्माण करणे सुलभ झाले आहे. ‘प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत’ प्रमुख उद्योगसमूहांसोबत 34 सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यामुळे सात लाख युवकांना कौशल्य प्राप्त होईल.

    11. मला हे सांगण्यास आनंद होत आहे की, मागील वर्षाच्या वन महोत्सव अभियानादरम्यान एकाच दिवशी विक्रमी 2 कोटी 82 लाख रोपे लावण्यात आली. आता पुढील तीन वर्षांमध्ये 50 कोटी रोपे लावण्याचे ठरविण्यात आले आहे. “उत्तमराव पाटील वन उद्यान योजने”अंतर्गत 68 जैवविविधता उद्यानेदेखील विकसित करण्यात येत आहेत. ‘बंगळुरु उद्याना’च्या धर्तीवर चंद्रपूर येथे एक वनस्पती उद्यान विकसित करण्यात येत आहे.

    12. माझ्या शासनाने, खासगी वसतिगृहांची व्यवस्था करता यावी म्हणून आर्थिक पाठबळ पुरविण्याकरिता इयत्ता 9 वी व 10 वी च्या विद्यार्थ्यांकरिता तसेच व्यावसायिक आणि बिगर-व्यावसायिक पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पाठ्यक्रमांना प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती आणि नवबौध्द समाजातील विद्यार्थ्यांकरिता ‘‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’’ सुरु केली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना थेट रोख रकमेच्या स्वरूपात लाभ घेता यावा म्हणून राज्य शासनाने ‘‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंयोजना’’ सुरु केली आहे. तसेच अल्पभूधारक आणि कामगारांच्या मुलां-मुलींकरिता ‘‘डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना’’ राबविण्यात येत आहे.

    13. बंधू आणि भगिनींनो, कोणतेही अर्थसहाय्य किंवा लाभ अथवा सेवा यांकरिता आधार हीच लाभार्थ्यांची एकमेव ओळख बनविण्यासाठी, महाराष्ट्र आधार अधिनियम 2016 अधिनियमित करणारे, महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

    14. मुंबईचे जागतिक दर्जाच्या शहरात रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्ग प्रकल्पाचा विस्तार म्हणून वर्सोवा-वांद्रे सेतू मार्ग प्रकल्प उभारण्यात येत आहे. जुलै 2018 पर्यंत नेरुळ-उरण रेल्वे कॉरिडॉर कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.

    स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महाराष्ट्रातील अधिकाधिक शहरे निवडण्यात आलेली आहेत. मुख्य ठिकाणांच्या दळणवळण सेवेत सुधारणा करण्यासाठी राज्यात 10 विमानतळे विकसित करण्यात येत आहेत.

    माझ्या शासनाने, नागपूर आणि मुंबई दरम्यान 46 हजार कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चाचा “समृध्दी कॉरिडॉर” हा अति द्रुतगती दळणवळण महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नागपूर मेट्रो व पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. महामार्ग वगळता मुख्यमंत्री ग्रामीण रस्ते कार्यक्रमांतर्गत 30 हजार किलोमीटर इतक्या ग्रामीण रस्त्यांची दर्जावाढ करण्यात येत आहे. आम्ही, मुंबईतील नवीन भाऊंचा धक्का ते रायगडमधील मांडवा बंदरापर्यंत आणि मुंबईतील नवीन भाऊंचा धक्का ते नवी मुंबईतील नेरुळपर्यंत प्रवासी बोटसेवा सुरु करण्याचे ठरविले आहे.

    15. माझ्या सन्माननीय नागरिकांनो, विधिविषयक कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर वाढविण्याकरिता प्रयत्नांची शिकस्त करीत आहोत. मराठी भाषेतील सर्व नवीन कायदे व सुधारित कायदे कालबध्द रीतीने उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

    16. प्रसार माध्यमांतील व्यक्तींवर होणारे हल्ले रोखण्यासाठी विधेयक अधिनियमित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

    17. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2016 अंतर्गत आजतागायत जवळपास 372 सेवा पुरविण्यात आल्या आहेत.

    18. राज्य शासन, राज्याच्या 51 शहरांमध्ये ‘प्रधानमंत्री आवास योजने’ची अंमलबजावणी करील. माझ्या शासनाने, बृहन्मुंबई विकास नियंत्रण विनियमांमध्ये फेरबदल केल्यामुळे म्हाडाला बी.डी.डी. चाळींचा पुनर्विकास करणे शक्य झाले आहे.

    महा-रेरा किंवा महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. प्राधिकरण, गृहनिर्माण प्रकल्पांतील खरेदी व विक्रीची प्रक्रिया पारदर्शक, भरवशाची व विश्वासार्ह करण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी करील.

    19. 2017 हे वर्ष ‘व्हिजीट महाराष्ट्र वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत आहे. महाराष्ट्र हा उत्कृष्ट वनस्पतीसमूह आणि प्राणिजात यांनी संपन्न असा प्रदेश आहे. मला खात्री आहे की, नवीन पर्यटन धोरणामुळे या पर्यटन क्षेत्रातील वाढीची नवीन दालने खुली होतील.

    20. राज्याच्या सामाजिक-आर्थिक विकासासह जनतेचे कल्याण करुन सर्वांगीण विकास साध्य करण्यास माझे शासन बांधील आहे, असा मी आपणांस विश्वास देत आहे.

    21. राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हार्दीक शुभेच्छा देतो. आधुनिक, प्रगत व सक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मला आपल्या मन:पूर्वक सहकार्याची अपेक्षा आहे.

    जय हिंद ! जय महाराष्ट्र !!