बंद

    महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांचे भाषण

    प्रकाशित तारीख: May 1, 2019

    महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांचे भाषण

    दि. 1 मे, 2019 बुधवार रोजी शिवाजी पार्क, मुंबई येथे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या प्रसंगी महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री.चे.विद्यासागर राव यांचा संदेश.

    बंधू आणि भगिनींनो,

    1. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनेतला माझ्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.

    2. आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीमध्ये कामगारांचे बहुमोल योगदान आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.

    3. आजच्या उत्कृष्ट संचलन सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व दलांच्या जवानांचे मी अभिनंदन करतो.

    बंधू आणि भगिनींनो,

    4. सामाजिक सुधारणांच्या बाबतीत, महाराष्ट्र नेहमी अग्रस्थानी राहिलेला आहे. सामाजिक समता, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि अंधश्रद्धेचे उच्चाटन याकरिता आपले आयुष्य वेचणाऱ्या ध्येयवादी नेत्यांचा आपल्या राज्याला मोठा वारसा लाभला आहे हे आपले भाग्य आहे. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर आणि समाजसुधारक नेत्यांचे स्मरण करणे औचित्यपूर्ण ठरेल.

    5. महाराष्ट्राच्या विविधतेतून संपूर्ण भारताचे दर्शन घडते. देशातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक राज्य आहे. जगभरातील विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासक यांना आकर्षित करणारी उच्च दर्जाची अनेक विद्यापीठे आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक संस्था आपल्या राज्यात आहेत.

    6. विस्तीर्ण असे विलोभनीय समुद्रकिनारे, पर्वत रांगा, वने, गड-किल्ले, नदी खोरे आणि पठारे यामुळे आपले राज्य नैसर्गिक सौंदर्यांने समृद्ध झाले आहे. विपुल जैवविविधतेने नटलेले ताडोबा, मेळघाट, पेंच यासारखी अभयारण्ये देखील आपल्या राज्याला लाभली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे देशातील पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सर्वाधिक आवडीच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण ठरले आहे.

    7. महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती औद्योगिक विकासाला पोषक अशी आहे. देशांतर्गत तसेच विदेशी गुंतवणुकीसाठी सर्वाधिक आकर्षक ठिकाण म्हणून असलेले आपले अग्रस्थान महाराष्ट्राने कायम राखले आहे. आपले राज्य, हे देशाचे आर्थिक शक्तीकेंद्र असून देशाच्या पायाभूत विकासात महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र हे शेती, औद्योगिक उत्पादने, व्यापार आणि दळणवळण क्षेत्राच्या बाबतीत देखील देशातील आघाडीचे राज्य आहे. त्यामुळेच देशातील अत्यंत विकसित आणि समृद्ध अशा राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो.

    8. महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविण्यामध्ये मुंबईचे फार मोठे योगदान राहिले आहे. मुंबई शहरात बहुसंख्य बँका, उद्योग समूह आणि वित्तीय संस्था

    यांची मुख्यालये आहेत. तसेच, भारताचा सर्वात मोठा शेअर बाजार आणि जगप्रसिद्ध अशी चित्रपट नगरी याच शहरात आहे.

    9. मुंबई हे भारताच्या महत्त्वाच्या बंदरांपैकी एक महत्त्वाचे बंदर आहे. तेथून खूप मोठ्या प्रमाणावर विदेशी व्यापार चालतो. औद्योगिक उत्पादने, आर्थिक आणि सेवा क्षेत्राचे एक महत्वाचे केंद्र बनले आहे. पुणे हे, देशाचे माहिती तंत्रज्ञान व वाहन उद्योगनिर्मिती क्षेत्रातील प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे. नागपूर, कोल्हापूर आणि सोलापूर हीदेखील विकासाची शक्तीकेंद्रे आहेत. सायबर सुरक्षेची अंमलबजावणी करण्यात आणि नागरिक व उद्योगव्यवसायांना सुरक्षित सायबर सेवा देण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे.

    10. उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही, आपल्या राज्याची मोठी शक्ती आहे. महाराष्ट्र हा शांतता, प्रगती आणि सर्वसमावेशक विकास या दिशेने सतत वाटचाल करत राहील, याचा मला विश्वास आहे.

    11. एक नवीन व बलशाली असा महाराष्ट्र घडविण्यासाठी एकत्र येण्याचे मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे. पुन्हा एकदा, महाराष्ट्र दिनाच्या या प्रसंगी महाराष्ट्राच्या जनतेला मी मन :पूर्वक शुभेच्छा देतो.

    जय हिंद ! जय महाराष्ट्र !!