बंद

    महाराष्ट्र आरोग्यदीप’ दिवाळी अंकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

    प्रकाशित तारीख: November 16, 2018

    महाराष्ट्र आरोग्यदीप’ दिवाळी अंकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

    लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजाराविषयी समाजात जाणीवजागृती होणे आवश्यक

    – राज्यपालांचे आवाहन

    मुंबई, दि. 16 : लठ्ठपणा हे बहुतांश आजारांचे मूळ असल्यामुळे त्याविषयी समाजात जाणीवजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. अनियमित जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यवर त्याचा वाईट परिणाम होतो. लहान मुले तसेच प्रौढांमध्ये याचे प्रमाण वाढत असल्यामुळे त्याची विशेष दखल घेतली पाहिजे. समाजात या संदर्भात जाणीवजागृती करण्यासाठी ‘महाराष्ट्र आरोग्यदीप’ या दिवाळी विशेषांकाने महत्वाचे पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज येथे केले.

    आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘महाराष्ट्र आरोग्यदीप’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन राजभवन येथे झालेल्या सोहळ्यात करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी आरोग्य मंत्री डॉ. सावंत, डॉ. स्वप्नेश सावंत, डॉ. दीपक नामजोशी, मुद्रक आनंद लिमये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

    राज्यपाल यावेळी म्हणाले, लहान मुले व प्रौढांमध्ये स्थूलतेचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. त्यामुळे पालकांमध्ये याबाबत जाणीवजागृती करणे आवश्यक आहे. या दिवाळी अंकामध्ये स्थुलता आणि त्यामुळे होणारे आजार या विषयावर तज्ज्ञांनी लेखन केले असल्याने त्याचा सामान्य नागरिकाला नक्कीच उपयोग होईल. महाराष्ट्रात दिवाळी सणामध्ये फराळाबरोबरच दिवाळी अंकांचं अतुट नाते आहे. दिवाळी अंकांमुळे वाचन संस्कृति जपण्यास मदत होत असल्याचे राज्यपालांनी सांगितले. आरोग्यदीप दिवाळी अंकात मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत माहिती असल्यामुळे सर्वांसाठी सोयीस्कर ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

    प्रत्येक शाळांमध्ये मोफत दंत तपासणी, वैद्यकीय शिबीर आयोजित केले पाहिजेत. त्यामुळे भविष्यात आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यास मदत होईल. या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

    आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, स्थुलतेचे नेमके कारण काय, त्यापासून होणारे आजार याची नेमकी माहिती वाचकापर्यंत पोहचावी यासाठी दिवाळी अंकाचा प्रयत्न केला आहे. या अंकाच्या माध्यमातून आरोग्य चळवळ निर्माण होऊन निरोगी युवा पिढी व्हावी, यासाठी दर तीन महिन्यांनी विविध विषयांवर आधारित विशेषांक प्रकाशित करण्याचा मानस असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. स्थुलता हे अनेक आजारांचे मुळ असल्याने सामान्य वाचकाला सहज सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न या दिवाळी अंकातून झालेला आहे. हा अंक मोफत वितरित करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

    कार्यक्रमास आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या पत्नी डॉ. अनिला सावंत, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आहार तज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित, ऋजुता दिवेकर यांच्यासह आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते दिवाळी अंकाच्या लेखकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात आणि समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

    महाराष्ट्र आरोग्यदीप दिवाळी अंकात डॉ. रेखा दिवेकर, डॉ. फुलरेणू चौहान, डॉ. जयश्री तोडकर, डॉ. जयदीप पालेप, डॉ. खुस्राव बजन, डॉ. रमाकांत पांडा, डॉ. शेखर भोजराज, डॉ. प्रियांक पटेल, डॉ. दीपक नामजोशी, डॉ. स्वप्नेश सावंत, डॉ. गिरीश परमार, डॉ. रेखा डावर, डॉ. सीमा दंदे, डॉ. निर्झरी मंगेशीकर, डॉ. टी. सुंदरराजन, डॉ. रोहन नवलकर, डॉ. अवंती त्रिवेदी, डॉ. राजेश जोशी, डॉ. विमल पहुजा, डॉ. मुफ्फझल लकडावाला, डॉ. संजय बोरुडे, डॉ. ऋजुता दिवेकर, डॉ. जगन्नाथ दीक्षित, श्रीमती सुवर्णा सावंत, वैद्य प्रवीण जोशी यांनी विविध विषयांवर लेखन केले आहे.