बंद

    मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना राज्यपाल विद्यासागर राव यांचे अभिवादन

    प्रकाशित तारीख: September 17, 2018

    महाराष्ट्र शासन

    जिल्हा माहिती कार्यालय, जालना

    मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना

    राज्यपाल विद्यासागर राव यांचे अभिवादन

    जालना, दि. 17 – मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढयामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अभिवादन केले.

    यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, खासदार रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे, स्वातंत्र्य सैनिक रामेश्वर दायमा, विक्रमराव घुगे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्या, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा आदींची उपस्थिती होती.

    राज्यपाल श्री विद्यासागर राव म्हणाले की, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले,परंतु हैदराबाद संस्थानातील या मराठवाडा त्यावेळी पारतंत्र्यात होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल एक वर्ष एक महिना आणि दोन दिवसांनी हैदराबाद संस्थान 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त होऊन भारतीय गणराज्यात विलीन झाले. निजामाच्या जुलमी राजवटीपासून मुक्तता होण्यासाठी मराठवाड्यातील भूमीपुत्रांचे मोठे योगदान आहे. मराठवाडा, कर्नाटक, तेलंगणा येथील अनेक ज्ञात-अज्ञातांनी मुक्तीसंग्रामामध्ये मोठे योगदान दिले आहे. त्या सर्वांचे स्मरण करणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी शालेय पाठयपुस्तकामध्ये याचा समावेश करण्याची गरज असल्याचे मतही राज्यपाल विद्यासागर राव यांनी यावेळी व्यक्त केले.

    जालन्याशी आपल्या अनेक आठवणी असल्याचे सांगत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने येथे उपस्थित राहता आले याचा मनस्वी आनंद व्यक्त करत मुक्तीसंग्रामाचा हा सोहळा पाहून आपण भारावून गेलो असल्याची भावनाही यावेळी राज्यपाल यांनी यावेळी व्यक्त केली.

    यावेळी स्वातंत्र्य सैनिक रामेश्वर दायमा, विक्रमराव घुगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मराठवाडा मुक्ती संग्रामावर आधारित चित्रफितही यावेळी उपस्थित मान्यवरांना दाखविण्यात आली.

    या कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक सर्वश्री रामेश्वर दायमा, विक्रमराव घुगे, किसन बोचरे, पुंजाबा कोलते, सांदू काकडे, तेजराव कोलते, रंगनाथ कोलते, लक्ष्मण दळवी, श्रीमती सुमंगला खेकाळे, लक्ष्मीकांत देशपांडे, विश्वनाथ भोंगाने यांच्यासह पदाधिकारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.