बंद

    भारतीय संस्कृतीचा वारसा जपत युवकांनी भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत योगदान द्यावे – राज्यपाल आचार्य देवव्रत

    प्रकाशित तारीख : January 7, 2026
    07.01.2026: राज्यपालांनी राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड झालेल्या तरुणांशी दुरस्थ माध्यमातून संवाद साधला

    ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ कार्यक्रमात राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा युवकांशी संवाद

    भारतीय संस्कृतीचा वारसा जपत युवकांनी
    भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत योगदान द्यावे
    -राज्यपाल आचार्य देवव्रत

    मुंबई, दि. ७ : भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची व मोलाची आहे. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी युवकांनी विचार, कृती आणि नव कल्पनांच्या माध्यमातून पुढे येऊन भारतीय संस्कृतीचा वारसा जपत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

    राष्ट्रीय युवा महोत्सव-विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२५-२६ राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्यातून निवड झालेल्या युवकांशी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

    सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास क्रीडा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सह सचिव एस. राममूर्ती, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील पांढरे, सहाय्यक संचालक मिलिंद दीक्षित, मुंबई विभागाच्या क्रीडा उपसंचालक सुवर्णा बारटक्के व राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड झालेले विद्यार्थी उपस्थित होते.

    राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभाग हा राज्यातील युवकांसाठी गौरवाची व प्रेरणादायी बाब असल्याचे गौरवोद्गार काढून दिल्ली येथील संवाद कार्यक्रमासाठी निवड झालेल्या युवकांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शुभेच्छा दिल्या.

    राज्यपाल आचार्य देवव्रत युवकांशी संवाद साधताना म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाला नवे स्वरूप देण्यात आले असून देशातील सर्व राज्यातून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक परीक्षा घेण्यात आली. त्यातून निवड झालेल्या तीन हजार गुणवंत युवकांना थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी या महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार आहे. मेहनत, परिश्रम व गुणवत्तेच्या बळावर या स्पर्धेसाठी निवड झालेल्या युवकांचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी कौतुक केले. ते म्हणाले, या स्पर्धेसाठी झालेली युवकांची निवड ही विकसित राष्ट्र निर्माणातील त्यांच्या कष्टाच्या भूमिकेची पावती आहे.

    भारत हा युवकांचा देश आहे. युवक देशाच्या विकासाला अधिक गती देण्याची भूमिका बजावू शकतात, असा विश्वास व्यक्त करून राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, भारताचा विकास फक्त आर्थिक किंवा भौतिक उन्नतीपुरता मर्यादित नसून, संस्कृती, सभ्यता, परंपरा व नैतिक मूल्यांचे जतन हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करतो. संपूर्ण विश्व हे एक कुटुंब मानणारी विचारधारा ही भारताची ओळख असून भारताने संत-महात्म्यांच्या माध्यमातून मानवतेचा संदेश जगभर पोहोचविला असल्याचेही राज्यपाल आचार्य देवव्रत यावेळी म्हणाले.

    राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, देश सर्व क्षेत्रात प्रगती करीत असून स्टार्टअप्स, आत्मनिर्भर भारत अभियानामुळे भारत जागतिक पातळीवर वेगाने प्रगती करत आहे. भारत आज जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला असून, तिसऱ्या क्रमांकाकडे वाटचाल करीत आहे. विकासाचा लाभ समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत आहे. युवकांमध्ये देशाला आत्मनिर्भर, समृद्ध आणि शक्तिशाली बनविण्याची क्षमता असल्याचे सांगून राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले युवकांनी अपयश आल्यास खचून न जाता परिश्रम, चिकाटी आणि सकारात्मक विचार करून विकसित राष्ट्र निर्माणात आपले योगदान द्यावे.

    या संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवरही राज्यपालांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी निवड झालेल्या युवकांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले.

    २०२५-२६ या वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सवाचे दिल्ली येथे ९ जानेवारी २०२६ पासून आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय युवा महोत्सव-विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग या अंतर्गत ऑन लाईन स्पर्धा प्रथम टप्पा विकसित भारत क्विज, व्दितीय टप्पा निबंध लेखन स्पर्धा, तृतीय टप्पा –विकसीत भारत पीपीटी चॅलेंज अशी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतून राज्यामधून ४५ युवांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय युवा महोत्सव अंतर्गत सांस्कृतिक विभागातून २८ कलाकारांची आणि डिझाईन फॉर भारत आणि हॅक फॉर सोशल कॉज या स्पर्धेतून ५ स्पर्धकांची निवड करण्यात आली आली आहे. राज्यातून निवड झालेल्या युवक व त्यांच्यासोबत असलेल्या अधिकारी वर्गासह ८५ जणांचा चमू दिल्ली येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी आज मुंबई येथून रवाना झाला.