बंद

    भारताची वाटचाल विश्वगुरूच्या दिशेने – उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

    प्रकाशित तारीख: September 26, 2019

    भारताची वाटचाल विश्वगुरूच्या दिशेने – उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

    मुंबई, दि. 26 : भारत झपाट्याने आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करित आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील वित्तीय संस्थांनी सुध्दा ही बाब मान्य केली आहे. अनेक पथदर्शी बाबींसाठी देश आज जगभर ओळखला जात असून मागील काही वर्षात विश्वगुरू बनण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले.

    प्रा.यशवंतराव केळकर स्मृतीनिमित्त आयोजित प्रथम व्याख्यान कार्यक्रमात “नेशन फर्स्ट’” या विषयावर श्री.नायडू यांनी आपले विचार व्यक्त केले. मुंबई शेअर बाजारच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी तर प्रमुख पाहुणे म्हणून बीएसईचे मुख्य आर्थिक अधिकारी नयन मेहता, सुनिल आंबेकर, आशिष चव्हाण आदी उपस्थित होते.

    प्रा.यशवंतराव केळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्याख्यानमाला सुरू केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी मराठीतून आयोजकांचे कौतुक केले. प्रा. केळकर यांच्यासोबत विद्यार्थीदशेतच काम करण्याची संधी मिळाली, ते अनेकांचे मार्गदर्शक आणि चांगले मित्र होते, असेही उपराष्ट्रपती श्री.नायडू यांनी सांगितले.

    नेशन फर्स्ट असे म्हणत असताना केवळ देश प्रथम असाच त्याचा अर्थ नाही. सर्वांना समान संधी, समाजातील शेवटच्या घटकांचा विकास, महिलांना बरोबरीचे स्थान, गरिबी निर्मूलन, एक देश, एक नागरीक आणि देशाबद्दल प्रत्येकाच्या मनात असलेला आदर या बाबी सुध्दा महत्वाच्या आहेत. नेशन फर्स्टचा विचार मांडतांना प्रत्येकाने रचनात्मक, सकारात्मक कामाने देशाच्या विकासासाठी कसे योगदान देऊ शकू, याचा विचार केला पाहिजे. यासोबतच देशाच्या भविष्यासाठी प्रकृती, संस्कृती आणि एकात्मतेचा विचारही आवश्यक आहे. देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जात असतांना काही आव्हाने सुध्दा आहेत. त्या आव्हानांचा सामना सुध्दा करावा लागणार असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले.

    राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनीसुध्दा यावेळी आपले विचार व्यक्त केले. सुरूवातीस मराठी भाषेतून त्यांनी प्रा.यशवंतराव केळकर यांना श्रध्दांजली अर्पण केली. प्रत्येक युवक पदाने मोठा व्यक्ती होऊ शकत नसला तरी चांगला राष्ट्रपुत्र मात्र बनू शकतो. आपल्या सकारात्मक दृष्टीकोनातून उद्योग, व्यवसाय, सामाजिक क्षेत्र आणि राजकारणात सुध्दा चांगली संधी निर्माण करू शकतो, असेही राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले.