बंद

    प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या एन.सी.सी. चमूला राज्यपालांची कौतुकाची थाप

    प्रकाशित तारीख: February 4, 2019

    प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या एन.सी.सी. चमूला राज्यपालांची कौतुकाची थाप.

    सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.

    नुकत्याच नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये विविध वैयक्तिक व सांघिक स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या महाराष्ट्र एन.सी.सी. च्या चमूला राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी सोमवारी राजभवनावर बोलावून शाबासकी दिली.

    महाराष्ट्र ही छत्रपती शिवराय व सरखेल कान्होजी आंग्रे यांसारख्या शूरवीरांची भूमी आहे. या भूमीने परकीय सत्तेला सर्वात मोठे आव्हान दिले होते. आपण सर्व नागरिक एकात्म भावनेने राहिलो तर कोणतीही परकीय सत्ता आपल्याला पराभूत करू शकणार नाही. युवकांनी आयुष्यात नौकरी, व्यवसाय, उद्योग यापैकी कोणताही मार्ग निवडला तरीही देशाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे आणि बांधिलकी जोपासावी, असे आवाहन राज्यपालांनी एन.सी.सी. कॅडेट्सना केले.

    यावेळी एनसीसी चमूने महाराष्ट्राचे विविधांगी दर्शन घडविणारा सांगितीक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाला एनसीसीचे तसेच संरक्षण दलाचे अधिकारी उपस्थित होते.

    यंदा प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये महाराष्ट्र एनसीसीच्या ७४ मुले व ३७ मुलींच्या चमूने भाग घातला होता. महाराष्ट्राच्या रिशान संजय हेमाडी याने बेस्ट कॅडेट (आर्मी) हा खिताब पटकावला तर कार्तिकेय गौतम याने बेस्ट कॅडेट (एअर) हा खिताब प्राप्त केला. जुनियर अंडर ऑफिसर आसावरी तानवडे हिला द्वितीय तर इशा देव शर्मा हिला बेस्ट कॅडेट म्हणून तृतीय पारितोषिक प्राप्त झाले.

    कॅडेट सागर मुगले याला २६ जानेवारी रोजी राजपथ येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये मुलांच्या तुकडीचे नेतृत्व करण्याचा मान मिळाला. राज्यातील ५ मुले व २ मुलींना मान्यवरांना ‘सन्मान गार्ड’ देण्याचा बहुमान मिळाला.

    महाराष्ट्र एनसीसीने यंदा जिंकलेल्या स्पर्धा
    स्पर्धा. पारितोषिक
    सर्वोत्तम संचालनालय अखिल भारतीय स्थल सैनिक शिबीर (मुली) प्रथम
    नकाशा वाचन स्पर्धा (मुली) प्रथम
    हेल्थ व हायजिन (मुले) प्रथम
    नेमबाजी (मुले) (मुले) प्रथम
    शिप मॉडेलिंग प्रथम
    सुवर्ण पदक विजेते ६ कॅडेट्स
    रौप्य पदक विजेते १६ कॅडेट्स