बंद

    नागरिकांनी संविधानातील मुलभूत कर्तव्यांचे पालन करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    प्रकाशित तारीख: November 26, 2019

    अंतिम दिनांक:31.12.2019

    नागरिकांनी संविधानातील मुलभूत कर्तव्यांचे पालन करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    मुंबई, दि. 26 : नागरिकांनी संविधानातील मुलभूत कर्तव्यांचे पालन करुन संविधानाप्रती व देशाप्रती आपली निष्ठा व्यक्त करण्याचे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

    संविधान दिन व नागरिकांचे मुलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमेचा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृह येथे आज राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी श्री.कोश्यारी बोलत होते. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, विधीतज्ज्ञ डी.एन. संदानशीव, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर तसेच विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

    श्री.कोश्यारी म्हणाले, भारतीय संविधान निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्यांचा उचित सन्मान व्हावा म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. राज्यात नागरिकांच्या मुलभूत कर्तव्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी वर्षभर राबविण्यात येणारी मोहीम ही कौतुकास्पद आहे. नागरिकांनी छोट्या छोट्या गोष्टींमधूनही आपली कर्तव्य बजावावी. भारतीय राज्यघटना जगातील सर्वोत्तम राज्यघटनांपैकी एक असल्याचेही श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

    राज्यात 26 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2020 या वर्षाच्या कालावधीत ‘नागरिकांचे मुलभूत कर्तव्य जागरुकता मोहीम’ राबविण्यात येणार असून पुढील वर्षभर विविध विभागांमार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

    यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच नागरिकांची मुलभूत कर्तव्य या विषयावर विधीतज्ज्ञ प्रा.डी.एन. संदानशीव यांचे व्याख्यानही झाले.