बंद

    १९.०१.२०२० : नागरिकांनी संकल्प केल्यास एकल उपयोगाचे प्लास्टिक मुक्त भारत सहज शक्य – राज्यपाल

    प्रकाशित तारीख: January 19, 2020

    नागरिकांनी संकल्प केल्यास एकल उपयोगाचे प्लास्टिक मुक्त भारत सहज शक्य – राज्यपाल

    ठाणे दि. १९ : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणावर गंभीर स्वरुपाचे दुष्परिणाम होत आहेत. प्रत्येक नागरिकाने एकल वापराच्या प्लास्टिक वापरावर नियंत्रण आणण्याचा संकल्प केला तर एकल उपयोगाचे प्लास्टिक मुक्त भारत सहज साध्य असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

    रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी उत्तन येथे ‘एकल उपयोग प्लास्टिक निर्मुलन : शक्यता आणि संधी’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषद २०२० च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर प्रबोधिनी चे उपाध्यक्ष खा. विनय सहस्त्रबुद्धे, उद्योजक निरंजन हिरानंदानी, श्रीमती रेखा महाजन, महासंचालक रविंद्र साठे, रविंद्र पोखरणा, उमेश मोरे उपस्थित होते.

    यावेळी मार्गदर्शन करतांना श्री कोश्यारी म्हणाले, सर्वसामान्य पण जबाबदार नागरीक म्हणून आपण प्लास्टिकचे दुष्परिणाम वेळीच जाणायला हवेत. वास्तविक पाहता प्लास्टिक आपला शत्रू नाही, परंतु ज्या प्रकारे गरज नसताना प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय, ते थांबवणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळेस समाजातला एक जबाबदार घटक म्हणून आपणही समाजाचे काही देणे लागतो, ही भावना जोपासणे आणि या भावनेतून आपली विधायक अशी कृतिशील वाटचाल सातत्याने सुरु ठेवणे, ही आजची गरज बनली आहे. एकदाच वापराचे प्लास्टिक लोकांनीच हद्दपार करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे. इच्छा असेल तर मार्ग नक्कीच सापडतो असेही राज्यपाल यांनी सांगितले.

    दैनंदिन वापरातील प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध आणावयाचे असतील तर त्यासाठी जनतेला योग्य पर्याय देणे आवश्यक आहे.
    दोनशे अडीचशे वर्षांची गुलामगिरी नष्ट होऊ शकते तर प्लास्टिक मुक्त भारत सहज शक्य आहे, असेही श्री कोश्यारी म्हणाले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने एकल वापराच्या प्लास्टिक निर्मुलनासाठी आचारसंहिता तयार करावी. यासाठी चर्चासत्रे तसेच जनतेच्या सुचना मागवव्यात. या सर्वांच्या आधारे शासनाला रोडमॅप सादर करावा अशा सुचनाही राज्यपाल महोदयांनी यावेळी केल्या.

    प्रबोधिनी चे उपाध्यक्ष खा. विनय सहस्त्रबुद्धे यांनी परिषद आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.

    कार्यक्रमाचे प्रास्तविक महासंचालक रविंद्र साठे यांनी केले तर आभार प्रदर्शन रविंद्र पोखराणा यांनी केले.
    या दोन दिवसीय परिषदेत देशभरातील 16 राज्यांचे 203 प्रतिनिधी सहभागी झाले होते.