दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राजभवन येथे भ्रष्टाचार निर्मुलन प्रतिज्ञा; राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या संदेशाचे वाचन
दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आज (दि. २९) राजभवन येथे भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा देण्यात आली तसेच राज्यपाल चे. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदेशांचे उपस्थितांसमोर वाचन करण्यात आले.
राज्यपालांचे उपसचिव रणजीत कुमार यांनी राजभवनातील कर्मचारी, अधिकारी तसेच राजभवन येथे कर्तव्य बजावित असलेले सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस कर्मचारी यांना प्रतिज्ञा दिली, तर राज्यपालांचे परिवार प्रबंधक वसंत साळुंके यांनी राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या संदेशांचे वाचन केले.
देशाच्या आर्थिक, सामाजिक तथा राजकीय प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा एक मोठा अडथळा असून सर्व कामे प्रामाणिकपणे करण्याची प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांनी घेतली.
राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे संदेश:
दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त पाठविलेल्या संदेशात राज्यपालांनी ई-प्रशासन प्रणाली, विविध प्रक्रियांचे सुलभीकरण, किमान स्वाधिकाराचा वापर, तंत्रज्ञानावर आधारित खरेदी, इत्यादी उपाययोजनांमुळे सर्व क्षेत्रातील भ्रष्टाचार कमी करता येईल, असे सांगितले.
तर, प्रशासकीय यंत्रणेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टीने दक्षता जनजागृती सप्ताह महत्वपूर्ण ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशात म्हटले.
राज्यात दिनांक २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा दक्षता जनजागृती सप्ताहाचे ध्येयवाक्य ‘भ्रष्टाचार मिटवू – नवा भारत घडवू’ हे आहे.