बंद

    तुलनात्मक आणि विश्लेषणात्मक आंतरराष्ट्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून प्रा. बाळ आपटे अभ्यास केंद्र ओळखले जाईल – राज्यपाल

    प्रकाशित तारीख: August 19, 2019

    महान्यूज

    19 ऑगस्ट 2019

    मुंबई, दि. १९ : विद्यार्थी तसेच युवक-युवतींच्या चळवळींबद्दल तसेच जगामध्ये शैक्षणिक आणि संशोधन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आपले स्वतःचे समर्पित अभ्यास केंद्र असणे ही काळाची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी चळवळ आणि तरूणांसाठी तुलनात्मक आणि विश्लेषणात्मक आंतरराष्ट्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून प्राध्यापक बाळ आपटे अभ्यास केंद्र ओळखले जाईल असे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सांगितले.

    राज्य शासन आणि मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मुव्हमेंट सेंटरचे आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्याचवेळी या इमारतीचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह कार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांच्या हस्ते झाले.

    राज्यपाल यावेळी म्हणाले, आधुनिक चळवळींमध्ये जागतिक स्तरावर लोकांना एकत्रित करण्यासाठी तंत्रज्ञान आणि इंटरनेटचा वापर होतो. संप्रेषण काळ म्हणजेच कम्युनिकेशन ट्रेंडशी जुळवून घेणे हा यशस्वी चळवळीचा पाया आहे. जगभरातील सामाजिक परिवर्तनाच्या रचनात्मक आणि आंदोलनात्मक बाबींमध्ये विद्यार्थी व युवक चळवळीचे मोठे योगदान लाभले आहे. शास्त्रशुद्ध अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी मुंबई विद्यापीठात प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मुव्हमेंट सेंटर सुरु करण्यात येत असल्याचा आनंद आहे.

    भारतातच नव्हे तर जगातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वा आर्थिक परिवर्तनामध्ये युवावर्गाची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. या केंद्राच्या माध्यमातून जगभरातील विद्यार्थी व युवा चळवळींचा आंतरविद्याशाखीय तसेच तुलनात्मक अभ्यास करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील तसेच समकालीन विद्यार्थी युवाचळवळींची विचारप्रणाली, कार्यपद्धती, सामाजिक-राजकीय भूमिका व योगदान यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास हे या केंद्राचे वैशिष्ट्य असेल असा विश्वास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी यावेळी व्यक्त केला.

    आजचा विद्यार्थी हा उद्याचा नाही तर आजचा नागरिक आहे या मांडणीवर दृढ विश्वास ठेऊन त्यांच्याशी निगडीत विषयांची तर्कशुद्ध मांडणी करणे, या केंद्राच्या माध्यमातून केले जाणार आहे. या केंद्रातील विद्यार्थ्यांमधून आदीवासी विकास, ग्रामविकास, आरोग्य, पाणी, शिक्षण अशा विविध विषयांत काम करणारे सामाजिक नेते तयार होतील.

    इतिहास आपल्याला दाखवतो की, प्रत्येक पिढी एका यशस्वी चळवळीने प्रभावित झाली आहे. आज आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करीत आहोत. आपल्या जीवनात महात्मा गांधींनी समाजातील प्रचलित परिस्थिती बदलण्यासाठी आणि समाजातील विविध घटकांचे सबलीकरण होऊन समाजाची मानसिकता बदलण्यासाठी विविध चळवळी घडवून आणल्या. इतिहासातील सर्व चळवळींचे नेतृत्व नेहमीच तरुणांनी केले आहे. मानवी इतिहासाचा मार्ग बदलणाऱ्या शक्तिशाली सामाजिक चळवळींसाठी बाळ आपटे सेंटर ‘युवाशक्ती’ म्हणून ओळखले जाईल असेही राज्यपाल आपल्या भाषणात म्हणाले.

    महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, प्रा. बाळ आपटे यांना अगदी जवळून जाणून घेण्याचा बहुमान मला लाभला. यामुळे मला असे वाटते की, त्यांची स्मृती कायम जपण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी युवा चळवळींमध्ये अभ्यासाचे एक केंद्र तयार करणे यापेक्षा दुसरे काही असू शकत नाही. प्रा. आपटे एक उत्तम व्यक्ती, उत्तम विचारवंत होते. तरुण विद्यार्थ्यांना विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी तसेच,या विद्यार्थ्यांना समाजात बदल घडवून आणण्यासाठी, प्रेरित करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी या केंद्राची स्थापना केली गेली आहे.