जीवनात आनंदी राहण्यासाठी मुळ संस्कृतीकडे जाणे आवश्यक -राज्यपाल
अदिवासींच्या जीवनपद्धतीवर आधारित पुस्तकाचे राज्यपालांचे हस्ते प्रकाशन
आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा सत्कार
जीवनात आनंदी राहण्यासाठी मुळ संस्कृतीकडे जाणे आवश्यक
-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि.10; जीवनात आनंदी राहण्यासाठी मुळ संस्कृतीकडे जाण्याची आवश्यकता आहे. आदिवासींच्या गरजा कमी असल्याने ते समाधानकारक जीवन जगतात. त्यांच्याकडे असणारे वन औषधीचे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. झेप संस्थेच्या संचालिका डॉ. रेखा चौधरी यांनी लिहीलेल्या अदिवासी जीवनपद्धतीवर आधारित पुस्तक ‘इंडीयाज ॲनशियंट लिगसी ऑफ वेलनेस- ट्रायबल ट्रेजर ऑफ प्युअर नॉलेज’ या पुस्तकाचे प्रकाशन राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी मुक्ती फाऊडेशनच्या स्मिता ठाकरे मंचावर उपस्थित होत्या.
राज्यपाल पुढे म्हणाले, आपल्या संस्कृतीत गरजा कमी ठेवण्याबाबत सांगितले जाते. रावण लंकाधिपती होता मात्र समाधानी नव्हता, राम वनवासात होता तरी समाधानी होता. आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपला मानसिक आनंद दूर तर लोटत नाही ना? याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. प्राकृतिक गोष्टीचा वापर पुन्हा वाढवून त्या बाबत जनजागृती करावी असेही ते म्हणाले. डॉ. रेखा चौधरी यांचे पुस्तक जास्तीत जास्त लोकांना वाचता यावे यासाठी या पुस्तकाचा लवकरच मराठी आणि हिंदी अनुवाद यावा अशी अपेक्षा श्री. कोश्यारी यांनी व्यक्त केली.
यावेळी सामाजिक तसेच आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.यात मुक्ती फाऊंडेशनच्या स्मिता ठाकरे, कृषिका लल्ला, जया किशोरी, अनुष्का परवाणी, अर्चना नेवरेकर, निशा जामवाल, विकास मित्तल, रितू दत्ता, आहना कुमरा, पियुष जैसवाल, सिमरन आहुजा, स्मिता जयकर यांना राज्यपालांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.